मुंबई : ‘समाजासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या ‘आशा’ सेविकांवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. सध्याच्या परिस्थितीत मनोरंजन व समाजप्रबोधन एकत्रित होते, तेव्हा संबंधित गोष्ट लोकांच्या मनाला भिडते व रुजते. या सर्व गोष्टींचा उत्तम संगम ‘आशा’ चित्रपटाच्या माध्यमातून साधण्यात आला आहे. या चित्रपटाचे विविध चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक होत आहे आणि महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातही चार पुरस्कार पटकावले आहेत, याबद्दल संपूर्ण चमूचे मनापासून अभिनंदन. गेली अनेक वर्षे संपूर्ण देशात ‘आशा’ सेविकांनी स्वतःला झोकून देत काम केले आहे, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद’, अशी भावना शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
जागतिक कन्या दिनानिमित्त डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे राज्यभरातील आशा सेविका व महिलांसाठी ‘आशा’ या मराठी चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते.तसेच यावेळी ‘आशा’ चित्रपटाच्या विशेष फलकांचेही अनावरण करण्यात आले. याप्रसंगी श्रीकांत शिंदे, केंद्रीय आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शायना एनसी, ‘आशा’ चित्रपटात ‘मालती’ ही मुख्य भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू, लेखक – दिग्दर्शक दीपक पाटील, निर्मात्या दैवता पाटील व निलेश कुवर, कलाकार, तंत्रज्ञ आणि आशा सेविका उपस्थित होत्या. धैर्य, आशा, दुःख आणि आनंद या सर्व भावनांची गुंफण ‘आशा’ या चित्रपटात केली आहे. समर्पित भावनेचे दर्शन या चित्रपटातून घडते. हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘आपण डॉक्टरांना देव मानतो. पण त्याचबरोबरच गावखेड्यात जाऊन महिलांची प्रसूती करणे, औषधे पोहोचविणे आदी विविध वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे काम आशा सेविका करीत असतात. संपूर्ण देशात बाल मृत्यू दर व माता मृत्यू दर कमी करण्यात सर्वात मोठे योगदान आशा सेविकांनी दिले आहे. महाराष्ट्र सरकारने आशा सेविकांचे मानधन वाढविले आहे. तर महाराष्ट्रात आमचे सरकार पुन्हा सत्तेत आणण्याचे काम ‘आशा’ सेविका आणि लाडक्या बहिणींनी केले आहे, याचीही जाणीव आहे’, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले.
‘आशा’ चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल. ज्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट तयार केला, त्या आशा सेविकांच्या उपस्थितीत विशेष स्क्रीनिंग होत असल्याचा आनंद आहे. यासाठी श्रीकांत शिंदे यांनी मोलाचे सहकार्य करण्यासह विषयाचे कौतुक केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेहमी आरोग्य क्षेत्राविषयी जिव्हाळा राहिलेला आहे. त्यांचा हात नेहमी मोकळा असतो, हे विविध योजनांमधून दिसून येते. त्यामुळे त्यांना आरोग्य दूत म्हटले जाते. कोणत्याही चित्रपटाचा विषय जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत तसेच गावखेड्यापर्यंत पोहोचावा, ही दिग्दर्शकाची इच्छा असते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ‘आशा’ चित्रपट पहावा’, असे आवाहन दिग्दर्शक दीपक पाटील यांनी केले.
तर निर्मात्या दैवता पाटील म्हणाल्या की, ‘आपण अनेकदा महिलांची कथा पुरुषांच्या दृष्टिकोनातून पाहत असतो. पण जेव्हा एक महिला निर्माती महिलांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करते, तेव्हा कथेमध्ये संवेदनशीलपणा जास्तच असतो, याची ‘आशा’ चित्रपट पाहिल्यानंतर जाणीव होईल. तसेच ‘आशा’ चित्रपटाचा ट्रेलर युनायटेड नेशन्स वुमेन्समध्ये मार्च २०२५ मध्ये दाखविण्यात आला. त्यामुळे ‘आशा’ सेविकांचे काम तसेच माता – मृत्यू दर कमी करण्यासाठीचे योगदान आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. याबद्दल न्यू यॉर्कमध्ये प्रेझेंटेशन देता आल्याचा आनंद व अभिमान आहे’.