लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत येथील ३०५ रहिवाशांना अखेर मंगळवारी पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घराची हमी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीद्वारे दिली. मुंबई मंडळाने ३०५ घरांसाठी सोडत काढली असून या ३०५ रहिवाशांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच या रहिवाशांबरोबर करार करण्यात येणार आहे.

रहिवाशांच्या मागणीनुसार राज्य सरकारने पुनर्वसित इमारती उभ्या राहण्यापूर्वीच या इमारतीत पात्र रहिवाशांना कोणत्या मजल्यावर आणि कोणते घर असणार याची हमी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई मंडळाकडून सोडतीद्वारे ही हमी देण्यात येत आहे. आतापर्यंत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील अनेक पात्र रहिवाशांना घराची हमी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ना. म. जोशी मार्ग येथील पहिल्या टप्प्यातील सर्वच्या सर्व १२५० रहिवाशांची पात्रता निश्चिती करून त्यांना सोडतीद्वारे घराची हमी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील अंदाजे ९०० रहिवाशांसाठी सोडत काढून त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांच्याशी करारही करण्यात आला आहे. या टप्प्यातील ३०५ रहिवाशांची सोडत शिल्लक होती. काही बाबींच्या अनुषंगाने या सोडतीला रहिवाशांचा विरोध होता. त्यामुळे ही सोडत रखडली होती.

आणखी वाचा-मुंबई : वडाळा दुर्घटनेच्या चौकशीचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील आठवड्यात, शुक्रवारी, १० मे रोजी ना. म. जोशी मार्ग येथील ३०५ रहिवाशांना हक्काच्या घराची हमी देण्यासाठी सोडत काढण्यात येणार होती. सोडतीची सर्व तयारही झाली होती. मात्र या सोडतीला एकही रहिवासी उपस्थित न राहिल्याने सोडत रद्द करावी लागली होती. मात्र ही सोडत रद्द करतानाच मुंबई मंडळाने १४ मे रोजी रहिवाशी उपस्थित राहिले नाही तरी सोडत काढण्यात येईल अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार मंगळवारी ३०५ घरांसाठी सोडत काढण्यात आली असून पात्र ३०५ रहिवाशांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता लवकरच या रहिवाशांबरोबर करार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता ३०५ रहिवासी रहात असलेल्या चार इमारती रिकाम्या करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या ३०५ रहिवाशांना महिना २५ हजार रुपये घरभाडे देण्यात येण्याची शक्यता आहे.