मुंबई : शाकाहारींसाठी राखीव असलेल्या जागी बसून मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांला आयआयटी मुंबईत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुढील सत्राच्या प्रवेश शुल्कामधून हा दंड वसूल करणार असल्याचे विद्यार्थ्यांला ई- मेलद्वारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे आयआयटी मुंबई पुन्हा एकदा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही दिवसांपूर्वी आयआयटी मुंबईतील खानावळीत मांसाहारास बंदी असल्याच्या आशयाचे फलक लावल्यामुळे संस्थेच्या आवारात वादंग झाले होते.
विद्यार्थी संघटनांनी फलकावर आक्षेप घेतला. अखेर प्रशासनाने असा कोणताही नियम नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी १२, १३ आणि १४ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या खानावळीतील सहा टेबल शाकाहारी विद्यार्थ्यांसाठीच राखीव ठेवण्यात आल्याची सूचना खानावळीच्या समन्वय समितीने (मेस काउन्सिल) दिली. या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांना ई- मेलद्वारे कळविण्यात आले होते. त्यानंतर एका विद्यार्थ्यांने खानावळी समन्वय समिती आणि अधिष्ठातांना मेल करून हा निर्णय चुकीचा व भेदभाव करणारा असल्याचे सांगितले.
हेही वाचा >>>‘क्यूआर कोड’शिवाय जाहिराती छापणाऱ्या ७४ विकासकांना कारणे दाखवा नोटिसा;पुण्यातील ४९ तर मुंबईतील २५ विकासकांचा समावेश
या निर्णयाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असून शाकाहारासाठी राखीव टेबलवर बसून मांसाहार करणार असल्याचेही ई – मेलद्वारे कळविले. त्यानंतर ई-मेल करणाऱ्या विद्यार्थ्यांसह तीन ते चार विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. त्यापैकी एका विद्यार्थ्यांला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. -मूळ निर्णय आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा प्रकार हा भेदभाव करणारा आणि अस्पृश्यता पसरवणारा असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा >>>नांदेडमधील रुग्णमृत्यूंची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल ; दोषींवर कठोर कारवाई
‘शांततेच्या मार्गाने विरोध तरीही कारवाई’
‘शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी सहा टेबल राखीव असल्याच्या निर्णयाला ३ ते ४ विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने विरोध केला होता. त्यापैकी एका विद्यार्थ्यांला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांबाबत प्रशासन नेमकी काय कारवाई करते? हे पाहून आम्ही भूमिका स्पष्ट करून योग्य तो निर्णय घेऊ’, असे आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल (एपीपीएससी) या विद्यार्थी संघटनेतील एका विद्यार्थ्यांने सांगितले.