मुंबई : मुंबईतील वायू प्रदुषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान, विलेपार्ले भागात पहिला गुन्हा महापालिकेच्या के पश्चिम विभागाने सोमवारी दाखल केला.

पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण नियमावलीला फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे आढळल्यामुळे पालिका मुख्यालयात मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी प्राधिकरणांना नियमावलीचे पालन करण्याचा इशारा पुन्हा देण्यात आला. नियमोल्लंघनाचे गुन्हे दाखल करताना बांधकाम कोणत्या प्राधिकरणाच्या हद्दीत आहे याचा विचार न करता सरळ गुन्हे दाखल करावेत असेही निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत नियम धुडकावणाऱ्या ३४४ बांधकामांना अशा नोटीसा जारी करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा >>> म्हाडाची १२ हजारांहून अधिक घरे पडून; विक्रीसाठी खासगी संस्थांची मदत, किमती कमी करण्याचाही पर्याय

सर्व सरकारी प्राधिकरणांनीही स्वत:ची भरारी पथके स्थापन करावीत, बांधकामांची पाहणी करून नियमावलीचे पालन होत नसल्यास काम थांबवण्याची नोटीस द्यावी, असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले. सर्व प्राधिकरणांनी नियमावलीचे पालन करण्याचे आश्वासन दिले असले तरी मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी नियम पाळणे शक्य नसल्याचे ‘एमएमआरडीए’ने म्हटले आहे. मेट्रोची सगळी बांधकामे हे रस्त्यावरच सुरू आहेत. त्यामुळे तेथे उंच पत्रे लावणे शक्य नसल्याचे ‘एमएमआरडीए’च्या प्रतिनिधींनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय घडले?

काम थांबवण्याची नोटीस देऊनही नियमांचे पालन केले नसल्याने विलेपार्लेतील  ‘भारत रिएल्टी व्हेन्चर्स’च्या खासगी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. अशा स्वरुपाचा हा पहिलाच गुन्हा आहे. धुळीस अटकाव करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी २५ फूट उंचीचा पत्रा लावण्याचा नियम असतानाही त्याचे पालन न करता बांधकाम सुरू होते.