मुंबई – आर्थिक गुन्हे शाखेने कॉक्स अँड किंग्सचे ग्रुपचे प्रवर्तक अजय अजीत पीटर केरकर आणि अन्य सात जणांविरुद्ध एसबीआय कार्ड अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची १०५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कंपनीचे अंधेरीत कार्यालय असल्यामुळे अंधेरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एसबीआय कार्ड अॅन्ड पेमेंट सर्व्हिस लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी (कायदा) या प्रकरणी तक्रार केली आहे.

तक्रारीनुसार, एप्रिल २०१२ ते जून २०१९ दरम्यान, अजय अजीत पीटर केरकर, उर्शिला केरकर आणि कंपनीतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बनावट ताळेबंद तयार केला. कागदोपत्री कंपनीला इतर कंपन्यांकडून मोठ्याप्रमाणात रक्कम येणे बाकी असल्याचे दाखवण्यात आले. आर्थिक पत अधिक वाढवून दाखवल्यामुळे तक्रारदार एसबीआय कार्ड अॅन्ड पेमेंट सर्व्हिसेसने कॉक्स अँड किंग्स कंपनीला सात कॉर्पोरेट कार्ड दिली. या सुविधेचा वापर करून कंपनीने वेळेत कर्जफेड न केल्यामुळे एसबीआय कार्डचे मुख्य रक्कम व व्याज मिळून एकूण १०५ कोटींचे नुकसान झाले, असे आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०२०-२१ मध्ये अजय केरकरला अटक केली होती. त्याच्याविरोधात विविध बँक फसवणूक प्रकरणांमध्ये किमान १० गुन्हे दाखल आहेत. त्यात फसवणूकीची रक्कम सुमारे तीन हजार कोटी रुपये आहे. केरकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

अंधेरी पोलिसांनी अजय केरकर, उर्शिला केरकर आणि इतर आरोपींविरुद्ध खालील भारतीय दंड विधान कलम ४०६ (फौजदारी विश्वासघात), ४०९ ( व्यापारी, बँकर, एजंट यांच्याकडून विश्वासघात), ४२० (फसवणूक), ४६५ ( बनावट कागदपत्र तयार करणे), ४६७ (बनावट मौल्यवान दस्तऐवज तयार करणे), ४६८ ( फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रे तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवज वापरणे) व १२०ब (कट रचणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. केरकर यांच्याविरोधात यापूर्वीही दाखल अनेक गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.