मुंबई : प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देता यावी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्याच्या तयारीच्या आणि आरक्षण यादीच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या आरक्षित प्रवाशांचे नाव, डबा आणि आसनाची माहिती असलेले आरक्षण यादी तयार केली जाते. मूळ स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून रेल्वेगाडी सुटण्यापूर्वी चार तास आधी आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाते. रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार, १० जुलै २०२५ पासून, पहिली आरक्षण यादी आता रेल्वेगाडी सुटण्यापूर्वी आठ तास आधी जाहीर करण्यात येणार आहे.
सुधारित आरक्षण यादीत वेळा पुढीलप्रमाणे
– पहाटे ५ ते दुपारी २ दरम्यान सुटणाऱ्या रेल्वेगाडीची पहिली आरक्षण यादी आदल्या दिवशी रात्री ९ वाजता तयार केली जाईल.
– दुपारी २ ते पहाटे ५ दरम्यान सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची पहिली आरक्षण यादी रेल्वेगाडी सुटण्यापूर्वी आठ तास आधी तयार केली जाईल.
– दुसऱ्या आरक्षण यादीसाठी सध्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही.
– अंतिम आरक्षण यादी रेल्वेगाडीच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधी तयार केला जाईल.
मध्य रेल्वे काय म्हणते…
प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त आसनासाठी आरक्षण करू शकतील. प्रवाशांनी यादीच्या वेळेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता यावे आणि शेवटच्या क्षणी गोंधळ व गर्दी टाळता यावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांना फायदा होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.