नीलेश अडसूळ, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोनाकाळात नोकरीधंदा बंद पडल्याने गल्लोगल्ली मत्स्यविक्री करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मासळी बाजारात जाणारा ग्राहक घटला असून तिथल्या वर्षांनुवर्षे मत्स्यविक्री करणाऱ्या आगरी-कोळी समाजातील महिलांवर आर्थिक संकट ओढवले आहे. परिणामी  मुंबईतील बरेचसे मासळी बाजार सध्या ग्राहकांविना ओस पडले असून तिथला एकू ण व्यवसाय पूर्वीच्या तुलनेने  ६० ते ७० टक्क्यांनी घसरला आहे.

करोनाच्या लाटेत अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्याने पोटापाण्यासाठी अन्य व्यवसायाची कास धरली. टाळेबंदी काळात गर्दी टाळण्यासाठी खवय्यांनी पारंपरिक मासळी बाजारात जाणे कमी के ले. त्याचा फायदा घेत बरीच मंडळी मत्स्य विक्रीकडे वळली. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे अनेकांनी हा व्यवसाय सुरूच ठेवला आहे. परंतु याचा थेट परिणाम पारंपरिक पद्धतीने मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या जीवनावर झाला आहे. मत्स्यविक्री करून कुटुंबाचे पोट भरणाऱ्या या महिला सध्या मासळी बाजारात ग्राहकांची वाट बघत दिवस ढकलत आहेत. गल्लोगल्ली मासेविक्र ेते आल्याने पूर्वीच्या तुलनेने २० टक्के ही ग्राहक बाजारात येत नाहीत, अशी नाराजी त्या व्यक्त करतात. मुंबईतील कलिना आणि वाकोला मासळी बाजारात ३० वर्षांहून अधिक काळ मत्स्यविक्री करणाऱ्या नयना पाटील यांच्या मते, ‘सध्या मत्स्यव्यवसायात केवळ नोकरी गेलेलीच मंडळी नाही तर अनेक बडय़ा कंपन्याही  उतरल्या आहेत. त्यामुळे मुंबईत पारंपरिक मासेमारी आणि मस्य विक्री करणारा आमचा समाज अडचणीत आला आहे. टाळेबंदीपूर्वी आम्हाला रोज मासे आणावे लागत होते. परंतु आता आणलेले मासे दोन-तीन दिवस तसेच पडून राहतात. विशेष म्हणजे बुधवार, शुक्रवार आणि रविवार या वारीही ग्राहक फिरकत नाहीत,’ अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. ‘मासळी बाजार पालिकेच्या जागेवर असल्याने आम्ही पालिकेला भाडे देतो, पालिकेचे नियम पाळतो. परंतु रस्त्यावर बसणारे हे नवे व्यावसायिक कोणत्याही बंधनाविना व्यवसाय करत आहेत. उद्या ते पुन्हा नोकरीवर जातील. परंतु आमचा बुडालेला व्यवसाय पूर्ववत होणे कठीण आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

केवळ याच बाजारात नाही कुलाबा, ग्रँट रोड, क्रॉफर्ड मार्केट, मरोळ आणि मुंबईतील सर्वच बाजारात ही ओरड असल्याची कुलाब्यातील सुनीता पाटील यांनी सांगितले. बंदरावर मासे आणण्यासाठी हल्ली आमच्या विक्रेत्यांपेक्षा नवीनच विक्रेत्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक विक्रेत्यांना आता मासे टिकवण्याचाही  खर्च वाढला आहे, असाही मुद्दा त्यांनी मांडला.

मासळी बाजारपेठेत शुकशुकाट

सिटीलाईट येथील माहीम मासळी बाजारात दादर, माहीम, माटुंगा, धारावी अशा ठिकठिकाणाहून ग्राहक येतात. आकाराने हा बाजार मोठा असला तरी ग्राहकांची रीघही तितकीच असते. परंतु गेल्या काही महिन्यांत इथे शुकशुकाट असल्याचे इथल्या भारती हंबिरे यांनी सांगितले. ‘माहीमचा बाजार प्रसिद्ध असल्याने मासे कितीही महाग झाले तरी आम्हाला ग्राहकांची कधी कमतरता भासली नाही. अगदी परप्रांतीय विक्रेत्यांचाही कधी फारसा परिणाम जाणवला नाही. परंतु सध्या अनेकांना ऑनलाइन मासे घ्यायची सवय लागली. घरपोच मासे मिळू लागल्याने लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली. पूर्वी दिवसाला हजार रुपये मिळत. आता शंभर रुपये मिळवतानाही  दमछाक होते,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fish selling women are facing financial crunch dd70
First published on: 26-11-2020 at 00:50 IST