मुंबई : शिवडी गाडीअड्डा येथे पर्जन्य जलवाहिनीचे काम सुरु असताना उघड्या गटारात पाच कामगार पडल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

मालाडमध्ये शौचालयाची टाकी साफ करताना तीन कामगारांचा मृत्यू ओढवल्याची घटना ताजी असतानाच शिवडीमध्ये तशीच घटना घडली आहे. शिवडीमध्ये हाजी बंदर रोड परिसरात एल अँड टी गेट क्रमांक एक जवळ ही घटना घडली. रविवारी पहाटे पावणेसहा वाजता ही दुर्घटना घडली. या परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागातर्फे काम सुरु आहे. त्या दरम्यान पाच कामगार उघड्या गटारात पडले. या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने हे कंत्राटी कामगार आणले होते. हे सर्व कामगार २० ते २५ वयोगटातील आहेत. या पाचही कामगारांना परिसरातील नागरिकांनी बाहेर काढले असून केईएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी मेहबूब इस्माईल या १९ वर्षीय कामगाराचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हेही वाचा – मीरा भाईंदरमधील भाजप-शिवसेना वाद शिगेला

हेही वाचा – सुनील तटकरेंचाही कडेलोट करावा लागेल… शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे धक्कादायक वक्तव्य

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

अन्य चार कामगारांवर उपचार सुरु असून त्यापैकी सलीम या २५ वर्षीय कामगाराची प्रकृती गंभीर आहे. शफाकुल (२२), कोरेम (३५), मोझालीन (३०) हे तीन कामगार रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.