मुंबई : अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील आणि प्रामुख्याने सोलापूरसह मराठवाड्यातील बाधित शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक सरकारच्या मदतीकडे आस लावून बसले आहेत. सरकारकडे नजरअंदाजानुसार झालेल्या नुकसानीची, ॲग्रीस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे सरकार तत्काळ, एकरकमी आर्थिक मदतीचा दिलासा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाने प्रत्यक्ष पूरग्रस्त भागांतील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होणार का, असा प्रश्न ही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे २४ जिल्ह्यांतील १३७ तालुके बाधित झाले आहेत. अहिल्यानगर, बीड, जालना, सोलापूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ या जिल्हे सर्वांधिक बाधित आहेत. फक्त सप्टेंबर महिन्यातील शेती पिकांचे नुकसान २६ लाख हेक्टरवर गेले आहे. अतिवृष्टी, महापूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी दौरे काढून बाधितांना धीर देण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या अडचणी, नुकसानीचे गाऱ्हाणे ऐकून घेताना दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा करण्यात आली.

राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी योजनेच्या निकषांमध्ये वाढ करून सरसकट एकरकमी प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी बाधितांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. . मुख्यमंत्री दिलेला शब्द पूर्ण करतील, अशी आशा बाधितांना आहे. सरकार मदत कधी देणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. तशी मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मदत निधी देतानाही राजकारण – सतेज पाटील

महापूर बाधितांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरे, घरांतील धान्य, जनावरे, शेती, शेतीतील उभी पिके सर्वकाही वाहून गेले आहे. पूरग्रस्त भागातील लोकांनी नजीकच्या पाहुण्यांकडे आश्रय घेतला आहे. शेती आणि पिके पाण्याखाली गेल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना गरजे इतकाही चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. विस्थापित झालेल्यांना अन्न- पाणी, आरोग्य सुविधा देणे, जनावारांना चारा – पाणी देणे, पूर ओसरल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करताना प्रशासनाची धावपळ उडाली आहे. अडचणीच्या काळात बाधितांना सरकारने सरसकट, एकरकमी प्रति हेक्टरी मदत जाहीर करून किमान निम्मी मदत तातडीने देणे गरजेचे होते. पण, तसे होताना दिसत नाही. सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मदतीची घोषणा करून लोकांची सहानुभूती मिळविण्याच्या प्रयत्नात दिसते, अशी टिका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली आहे.

दिवाळी पूर्वी मदत देणार – कृषीमंत्री भरणे

अतिवृष्टी, महापूर बाधितांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दहा दिवसांत पंचनामे पूर्ण करून बाधितांना दिवाळी पूर्वी मदत दिली जाईल. शेतकरी आणि बाधितांना मदत करताना सरकार हात अखडता घेणार नाही. स्थानिक पातळीवर मदतीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. युद्धपातळीवर मदतीचे काम सुरू आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.