मुंबई : मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने, सर्व उपहारगृहे, खाद्यपदार्थांची दुकाने बंद केल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. त्यानंतर, राज्यभरातून ट्रकद्वारे पाण्याच्या बाटल्या आणि अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला. तर, मुंबई महानगरातून ज्वारी, बाजरी, तांदळांच्या भाकऱ्या, पोळया आणि चटण्या, ठेचा, बटाट्याची भाजी, पिठले, वरण-भात सीएसएमटी परिसर, आझाद मैदानात पुरवण्यात आले.
मुंबईत गुरुवारपासून मराठा आंदोलक दाखल झाले होते. राज्यातील विविध भागातून आलेल्या मराठा आंदोलकांनी आपल्यासह शेगडी, सिलेंडर आणि तांदूळ, डाळी आणल्या होत्या. परंतु, बहुसंख्य आंदोलकांनी अन्नधान्याचा आणले नव्हते. आंदोलक मुंबईतील उपहारगृहे, खानावळ यावर अवलंबून होते. मात्र, ऐनवेळी मुंबईतील उपहारगृहे बंद केल्यामुळे आंदोलकांची जेवणाची प्रचंड गैरसोय झाली. त्याबाबत संपूर्ण राज्यभरात संदेश पसरल्याने, सर्व स्तरातून अन्नधान्याची रसद मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
सीएसएमटी परिसरात अनेक ट्रक भरून पाण्याच्या बाटल्या रविवारी आल्या होत्या. तसेच आझाद मैदानात ज्वारी, बाजरी, तांदळाच्या भाकऱ्यांचा आणि पोळ्यांचा ढीग रचला होता. शेंगदाणा, मिरचीचा ठेचा, पिठले-भाकरी, कांदा-भाकर, बटाट्याचीभाजी, उसळ, वरण-भात, छोले-भात असे खाद्यपदार्थ पुरवून मोठ्या प्रमाणात आंदोलकांची सोय करण्यात आली होती. तसेच रात्रीच्या जेवणाची तयारी सायंकाळपासून सुरू झाली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फोनवरुन मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला. तसेच दानवे यांनी मराठा आंदोलनाच्या जेवणाची सोय करण्यास सांगितले होते. त्यानुसार, मुंबई मराठी पत्रकार संघात दुपारपासून जेवणाची तयारी सुरू करण्यात आली होती.