देशमुखांविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणात ‘ईडी’कडे अर्ज

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आह़े  याबाबत त्यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) पत्र पाठवले आह़े 

‘‘या संदर्भातील मला ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार आहे. ‘सीआरपीसी’च्या कलम ३०६, ३०७ नुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची मी तुम्हाला विनंती करतो’’, असे पत्र वाझेंनी ‘ईडी’चे सहाय्यक संचालक तसीन सुल्तान यांना लिहिले आहे. या प्रकरणाबाबत आता ‘ईडी’चे अधिकारी विशेष पीएमएलए न्यायालयाच्या परवानगीने वाझेंचा जबाब महादंडाधिकाऱ्यापुढे सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत नोंदवू शकतात़

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २१ एप्रिल, २०२१ रोजी परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ११ मे, २०२१ रोजी ‘ईडी’ने देशमुख यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा (मनी लॉन्डिरग) गुन्हा दाखल केला. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी बार मालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये चार कोटी ७० लाख रुपये जमा केल्याचा आरोप आह़े  अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दोन हफ्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझेंनी केला होता. देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. बार मालकांकडून घेतलेली चार कोटी ७० लाख रुपयांची रक्कम ही तीच असल्याचा ‘ईडी’ला संशय असून देशमुख यांच्यामार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवालामार्फत दिल्लीतील कंपनी आणि पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत ही रक्कम जमा झाल्याचा ‘ईडी’चा दावा आहे.

‘ईडी’ने देशमुख व कुटुंबियांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नियंत्रण असलेल्या २७ कंपन्यांची ओळख पटवली आहे. या कंपन्यांमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ‘ईडी’च्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी देशमुख यांना अटक केल्यानंतर डिसेंबरमध्ये ‘ईडी’ने याप्रकरणी सुमारे सात हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. सध्या देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत.

‘ईडी’चा संशय..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बार मालकांकडून कोटय़वधींची रक्कम १ नंबरसाठी घेत असल्याचे वाझेंनी सांगितले होते. हा १ नंबर म्हणजे अनिल देशमुख असल्याचा संशय ‘ईडी’ला आहे. याप्रकरणी देशमुख व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित चार कोटी २० लाखांच्या मालमत्तेवर ‘ईडी’ने नंतर टांच आणली.