मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने)अटक केली होती. दिल्ली न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची ईडी कोठडी बुधवारी सुनवली आहे. पांडे यांनी आपण कोणत्याही प्रकारचे दूरध्वनी अभिवेक्षण केले नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
त्यांच्या कुटुंबियांशी संबंधीत १८ कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांबाबत ईडी तपास करत आहे. याप्रकरणी ईडीने एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण यांच्यासह मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक केली होती. पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिल्यानंतर आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली होती. या कंपनीला २०१० ते २०१५ या कालावधीत एनएसई सर्व्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरिक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते.
त्या काळात एनएनईमध्ये को-लोकेशन गैरव्यवहार झाला होता. याशिवाय आरोपींनी २००९ ते २०१७ या काळात भारतीय टेलिग्राफ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून एनएसई कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण करण्यात आल्याचा आरोप आहे.दूरध्वनी अभिवेक्षण करण्याच्या कामासाठी आरोपी कंपनीला अंदाजे ४ कोटी ४५ लाख रुपये देण्यात आले होते, असा आरोप आहे.