मुंबई : पाण्याने भरलेल्या बादलीत पडून ४ वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला. आकृती यादव असे मुलीचे नाव आहे.मालाड पूर्व येथील राजीव गांधी नगर परिसरातील चाळीत यादव दाम्पत्य राहतात. हे दोघेही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना ३ मुले आहेत. त्यापैकी आकृती यादव (४) ही सर्वात लहान मुलगी होती. त्यांच्या चाळीत पहाटे पाणी येते. त्यामुळे यादव दाम्पत्य सकाळी उठून पाणी भरून ठेवतात. मंगळवारी त्यांनी नेहमीप्रमाणे बादल्या, टब व ड्रम भरून ठेवले होते.

 त्यानंतर आकृती झोपेतून उठली व खेळता खेळता पाण्याने भरलेल्या बादलीकडे गेली. अचानक तोल जाऊन ती बादलीत पडली. काही वेळाने हा प्रकार यादव दाम्पत्याच्या लक्षात आला. आकृतीला बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.