मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभाराचा एक नमुना उघडकीस आला आहे. मुंबई महापालिका दरबारी २०२१ मध्ये केलेल्या एका तक्रारीचे उत्तर प्रशासनाने तब्बल चार वर्षांनी म्हणजेच सप्टेंबर २०२५ मध्ये दिल्याचे उघडकीस आले आहे. गिरगाव चौपाटीवरील राडारोड्याच्या तक्रारीचे चार वर्षांनी उत्तर देऊन मुंबई महापालिकेने एक नवीनच पायंडा पाडला आहे.

गिरगाव चौपाटी येथे अनधिकृतपणे राडारोडा टाकल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते झोरू भतेना यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये केली होती.

या पत्राला आता तब्बल चार वर्षांनी मुंबई महापालिकेच्या डी विभागाने लेखी उत्तर दिले आहे. गिरगाव चौपाटी येथे समुद्रालगत एका प्रेक्षक गॅलरीचे २०२१ मध्ये काम सुरू होते. या कामातील राडारोडा गिरगाव चौपाटीवर होता. प्रेक्षक गॅलरीचे काम एप्रिल २०२२ मध्ये पूर्ण झाले असून आता गिरगाव चौपाटीवर कोणत्याही प्रकारचा राडारोडा नाही, असे या लेखी उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याचेही प्रमाणपत्र पालिका प्रशासनाच्या संबंधित अभियंत्याने दिले आहे.

मुंबई महापालिकेच्या या लेटलतीफ कारभारावर सामाजिक कार्यकर्ते झोरु भतेना यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. पालिका प्रशासन हे अतिशय काटेकोरपणे काम करते. काही वर्षे उशीर झाला तरीही पालिका प्रशासन कार्यवाहीबाबत किती तत्पर आहे तेच यातून दिसून येते, अशी प्रतिक्रिया भतेना यांनी समाज माध्यमांवर दिली आहे.

दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेच्यावतीने प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची ब्रिटिशकाली पर्जन्यजलवाहिनी आहे. याच पर्जन्य जलवाहिनीवर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची ही प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीच्या कामादरम्यान चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर राडारोडा ठेवण्यात आला होता. त्याबाबत भतेना यांनी पालिकेच्या डी विभागाकडे २०२१ मध्ये तक्रार केली होती.

या गॅलरीच्या कामासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई हेरिटेज कंन्झर्वेशन कमिटी, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग अशा सर्व संबंधित विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे मिळाल्याचे पालिका प्रशासनाने या लेखी उत्तरात म्हटले आहे.

दरम्यान, या तक्रारीबाबत अर्जदाराला कळवण्याचे निर्देश जिल्हा सागरी व्यवस्थापन समितीने दिले होते. तक्रारीची प्रकरण बंद करण्यासाठी ही प्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यामुळे हे उत्तर दिल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.