मुंबई : वरळी परिसरात राहणारी टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री गार्गी मौशिक पटेल यांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडाल आहे. आरोपीने वॉशिंग मशीन, ऑडिओ रिसीव्हर,ॲम्प्लिफायर आणि डिशवॉशर विकत घेण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक केली. त्यासाठी अभिनेत्रीने फेसबुकवर जाहिरात दिली होती. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये अभिनेत्रीने त्यांच्या फेसबुक अकाउंटवर वॉशिंग मशीन विक्रीसाठी एक जाहिरात अपलोड केली होती. त्यानंतर अनेकांनी संपर्क साधला आणि व्यवहाराबाबत बोलणे सुरू झाले. या दरम्यान अभिनेत्रीने आपला मोबाईल क्रमांक काही व्यक्तींना दिला होता. एका व्यक्तीने १८ एप्रिल रोजी वॉशिंग मशीन खरेदी करण्याबाबत संपर्क साधला. त्या व्यक्तीने २४ एप्रिल रोजी पुन्हा दूरध्वनी करून तो विद्युत वस्तूंची खरेदी-विक्री करतो, असे सांगितले. त्यावेळी त्याने अभिनेत्रीला इतर जुन्या वस्तूही मी खरेदी करेन असे सांगितले. त्यानंतर अभिनेत्रीने एक ऑडिओ रिसीव्हर, ॲम्प्लिफायर आणि डिशवॉशर यांचे छायाचित्रही त्याला पाठवले. त्या सर्व वस्तूंची ४० हजार रुपये किंमत अभिनेत्रीने सांगितली. ती व्यक्ती सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी तयार झाली. त्यावेळी आरोपीने अभिनेत्रीकडे बँक खात्याचा क्रमांक मागितला. त्यानंतर त्याने ३५ हजार रुपये अभिनेत्रीला पाठवले. त्याबाबतचा संदेशही त्यांना मिळाला. उर्वरित ५ हजार रुपये लवकरच पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पुन्हा अभिनेत्रीला संदेश आला. त्यावेळी आरोपीने दूरध्वनी करून मी पाच हजारांऐवजी चुकून ५० हजार रुपये पाठवले आहेत. उर्वरीत रक्कम परत करण्यासाठी त्याने अभिनेत्रीकडे विनंती केली. तिने मोबाईलवर आलेला संदेश पाहिला असता त्यांना ५० हजार रुपये हस्तांतरीत झाल्याचा संदेश मिळाला होता.
अभिनेत्रीने पतीच्या बँक खात्यातून ४५ हजार रुपये आरोपीच्या बँक खात्यात पाठवले. त्यानंतर आरोपीने त्याला डॉक्टरांना ५० हजार रुपये पाठवायचे आहेत. मी तुम्हाला ५० हजार रुपये पाठवतो. तुम्ही मी सांगितलेल्या खात्यावर रक्कम हस्तांतरीत कराल का, असे विचारले. त्यावर अभिनेत्री तयार झाली असता त्यांना पुन्हा संदेश मिळाला. पण त्यांच्या पतीने बँक अॅप्लिकेशनमध्ये तपासले असता खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नव्हती. यानंतर त्या व्यक्तीने रक्कम परत पाठवण्यास विविध कारणांनी टाळाटाळ केली. शेवटी त्याने दूरध्वनी उचलणे बंद केल्यावर अभिनेत्रीला फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.