मुंबई- लोन ॲपवरून कर्ज न घेताही एका तरुणीची लैंगिक छळ करण्यात आला आहे. तिने कर्जाच्या चौकशीसाठी केवळ ॲप डाऊनलोड केले होेते. सायबर भामट्यांनी मात्र तिचा मोबाईल हॅक करून छायाचित्रांचा गैरवापर केला आणि तिची अश्लील छायाचित्रे प्रसारीत करून बदनामी केली. या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरूणी २० वर्षांची असून गोरेगावच्या लिंक रोड वरील भगतसिंग नगरात राहते. तिच्या वडिलांना १० जून रोजी १५ हजार रुपयांची आवश्यकता होती. काही दिवसांपूर्वी तिने युट्युबवर तात्काळ छोट्या रकमेची कर्जे देणाऱ्या ॲपबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार तिने गुगल प्ले स्टोअरवर तात्काळ कर्ज देणारे ॲप ( इन्टंट लोन ॲप) शोधले. त्यावेळी तिला ‘गोल्डसेलोन नावाचे ॲप दिसले. तिने ते ॲप डाऊनलोड केले आणि ते करण्यापूर्वी सर्व परवानग्यांना होकार दिला होता. या ॲपमध्ये तिने कोटक बॅंकेचा क्रमांक, आयएफसीए कोड, आधार आणि पॅन कार्डाचे तपशीलही भरले. त्यानंतर तिला कर्ज नामंजूर करण्यात येत असल्याचा मेसेज आला. त्यामुळे तिने ते ॲप मोबाईल मधून काढून टाकले होते.

दरम्यान, तिला १८ जून रोजी रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला. गोल्डसेलोन या ॲपद्वारे घेतलेले कर्ज १५ हजार रुपयांचे कर्ज फेडावे असे त्यात लिहिले होते. मी कर्ज घेतले नसल्याचे तिने त्या मोबाईल क्रमांकवार कॉल करून सांगितले. समोरील व्यक्तीने मग बॅंकेचे स्टेटमेंट आणि इतर तपशिल मागितले. तिने ते देण्यास नकार दिला आणि फोन ठेवून दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने पीडित तरुणी आणि तिच्या वडिलांचे मॉर्फ (संपादित) केलेली अश्लील छायाचित्रे पाठवली. त्वरीत या कर्जाच्या रकमेतील पंधराशे रूपये नाही पाठवले तर ही छायाचित्रे वायरल करण्याची धमकी दिली. मोबाईल हॅक करून तिची छायाचित्रे मिळवून ती संपादीत करण्यात आली होती.

काही वेळेतच पीडितेला तिचे मित्र मैत्रीणी आणि नातेवाईकांचे फोन यायला सुरवात झाली. त्या सर्वांना पीडितेची अश्लील छायाचित्रे पाठिवण्यात आली होती. या प्रकाराबाबत तिने एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६, ६७ (क), ६७ (ड) आणि फसवणुकीच्या कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्ज देणारे ॲप घातक

सायबर भामटे अनेक प्रकारचे कर्ज देणारे बनावट ॲप तयार करत असतात. त्यात ते कर्ज देऊन नंतर आर्थिक फसवणूक करतात. हे ॲप डाऊनलोड करताक्षणी मोबाईल मधील डेटा हॅक करतात. त्यामुळे मोबाईलमधील संपर्क क्रमांक, मोबाईल मधील छायाचित्रे त्यांना मिळतात आणि त्याचा गैरवापर करतात असे पोलिसांनी सांगितले. अशा कर्ज देणार्या ॲपच्या मोहात पडू नका असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.