मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार ? याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात ‘भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे’ असा मजकूर लिहिलेले फलक लावले आहेत. हे फलक दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत असून ‘महाविकास आघाडी’मध्ये मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे गट दावा करणार अशी चर्चाही रंगली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती  शिवाजी महाराज पार्क परिसरात सकाळपासूनच गर्दी झाल्याचे निदर्शनास येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. शिवसेना सचिव ॲड. साईनाथ दुर्गे यांनी ‘महाराष्ट्राच्या रक्षणासाठी; महाराष्ट्राच्या मनातले; निष्ठावंत शिवसैनिकांच्या भावी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे’ तसेच युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यात्नी ‘आम्हा निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनातले भावी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे’ अशा आशयाचे फलक लावले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर करोनाकाळात अत्यंत संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळली आणि विविध नैसर्गिक आपत्तीत सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावना दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>>मुंबई : १५ डबा लोकलच्या २०९ फेऱ्या, पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात आजपासून बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना (उद्धव ठाकरे)च्या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते दाखल झाले आहेत. कोणी रेल्वे तर कोणी खासगी दुचाकी, चारचाकी आणि विशेष बसने  छत्रपती शिवाजी महाराज पार्क गाठले. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा, ही ताकद कुणाची? शिवसेनेची, अरे कोण आला रे कोण आला ? शिवसेनेचा वाघ आला, मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’, शिवसेना जिंदाबाद आदी घोषणांनी दादर परिसर दणाणून गेला आहे.