मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील ७६९ विद्यार्थ्यांपैकी ३०४ विद्यार्थ्यांना पूर्व मुखकर्करोगाचे निदान झाल्याचे आढळून आले आहे. विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधिनतेबद्दल आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी चिंता व्यक्त केली आहे.

वाढत्या तंबाखू सेवनामुळे विद्यार्थ्यांना पूर्व मुखकर्करोग झाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांवर लेझर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे, अशी माहिती उईके यांनी लेखी उत्तरात दिली आहे. आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पूर्व मुखकर्करोग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या बाबत सरकार काय उपाययोजना करीत आहे, असा प्रश्न डॉ. परिणय फुके, प्रविण दरेकर, वसंत खंडेलवाल आदींनी या बाबत प्रश्न उपस्थित केला होता.

सन २०२२-२३ ते सन २०२४-२५ या काळात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, इंडियन डेंटल असोशिएशन, नागपूर यांच्या मार्फत गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, भामरागड, अहेरी प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. सात विद्यार्थ्यांची शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे लेझर शस्त्रक्रिया (सीओ २) करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भामरागड प्रकल्प अंतर्गत १७७८ विद्यार्थ्यांपैकी ४८७ विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे. तपाणीनंतर कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार आढळून आला नाही. अहेरी प्रकल्पांतर्गत २१६३ विद्यार्थ्यांपैकी १८९ विद्यार्थ्यांना व्यसन असल्याचे आढळून आले, त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना पूर्व मुखकर्करोगाचे निदान झाले असून, त्यांच्यावरही लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असेही लेखी उत्तरात म्हटले आहे.्