मुंबई : दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गुरुवारी पार पडले. न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा सहा फुटापर्यंतच्या पीओपीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात व त्यापेक्षा उंच मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्यात आले. त्याची रंगीत तालीमच दीड दिवसांच्या विसर्जनाच्या वेळी पार पडली. मात्र अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती होती. वादावादी, भांडणे, गोंधळात दीड दिवसांच्या गणपती विसर्जन पार पडले. परंतु, कृत्रिम तलावाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे पालिका प्रशासनाने आपलेच कौतुक केले आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. यंदा पीओपीच्या मूर्तींचा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने सहा फुटापर्यंतच्या पीओपीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात व त्यापेक्षा उंच मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे यावर्षी विसर्जन कसे असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. लहान मूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने तब्बल २९० कृत्रिम तलाव तयार केलेत. मात्र सरसकट सगळ्याच मूर्तीचे यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यामुळे शाडू मातीच्या गणेशमूर्ती असलेल्या भाविकांची पालिकेच्या यंत्रणेशी वादावादी झाली.

मालाड मार्वे, आक्सा अशा समुद्र किनाऱ्यांवर शाडूची मूर्तीही कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सक्ती केली जात होती. मात्र समुद्रात विसर्जन करायला मिळावे म्हणून ज्यांनी खर्च करून महागड्या मूर्ती विकत घेतल्या त्यांची ही फसवणूक असल्याचा आरोप मूर्तिकार वसंत राजे यांनी केला आहे. त्यामुळे मार्वे समुद्र किनारी भाविक आणि पालिकेची पथके यांच्यात वादावादी झाली. समुद्र चौपाट्यांवर यंदा पालिकेने कृत्रिम तलाव तयार केले असून चौपाट्यांवर आलेल्या सगळ्या मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित केल्या जात होत्या. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढलेल्या परिपत्रकानुसार यंदा पर्यावरणपूरक मूर्तीही कृत्रिम तलावातच विसर्जित केल्या जात असल्याचेही पालिकेच्या यंत्रणाकडून भाविकांना सांगितले जात होते. त्यामुळे न्यायालयाचे आदेश वेगळे आणि प्रत्यक्षात यंत्रणा वेगळे सांगत असल्याचा आरोप भाविक करीत होते.

रात्री नऊपर्यंत ३० हजार मूर्तींचे विसर्जन

गुरुवारी रात्री ९ पर्यंत एकूण २९ हजार ९६५ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक ३३७ तर, घरगुती २९ हजार ६१४ इतक्या मूर्तींचा आणि हरतालिकेच्या १४ मूर्तींचाही समावेश आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी उच्च न्यायालय व महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही केली आहे. मूर्ती विसर्जन सुरळीत होत असून कोणत्याही अप्रिय घटनेची नोंद झालेली नाही, असेही पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.