मुंबई : मुंबईत मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात पाणी साचले होते. पाण्याचा निचरा झाल्यांनतर आता त्याठिकाणी चिखल झालेला आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नयेत यासाठी महापालिकेने तातडीने संबंधित ठिकाणी धूर आणि औषध फवारणी करावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
मुंबईत नुकतेच अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे मंडपातून आगमन झाले. मात्र, पावसामुळे मंडपाच्या ठिकाणी पाणी साचले असून चिखल झाला आहे. यामुळे येथे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले. पालिकेने ही बाब लक्षात घेऊन तातडीने धूर फवारणी आणि साथरोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी करावी, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. संबंधित ठिकाणी औषध फवारणी केल्यास साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव टळू शकेल, असे ॲड. दहिबावकर यांनी सांगितले.