मुंबई : सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे मंगळवारी विसर्जन झाले. १ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे ५४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात सुमारे १ हजार सार्वजनिक गणेशमूर्तींचा, तर ४७ हजार घरगुती गणेशमूर्तींचा गणेशमूर्तींचा समावेश होता. तसेच, पाच हजार गौरींचेही विसर्जन करण्यात आले.

यंदा ६ फुटांखालील गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक असून ६ फुटांवरील मूर्तींची नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचेही नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ६ फुटांखालील पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करण्याची तोंडी परवानगी दिल्याचा दावा गणेशोत्सव समितीने केला होता.

मात्र, एमपीसीबीने त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नसल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत अधिकृत परवानगी मिळावी, यासाठी समितीतर्फे प्रयत्न केले जात आहेत. दीड दिवसाच्या विसर्जनात यावरून वाद झाले होते. दरम्यान, सात दिवसांच्या विसर्जनात एकूण ५४ हजार ३५३ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. त्यात १३२३ सार्वजनिक, तर ४७८१७ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे. तसेच, ५ हजार २१३ गौरींचेही सातव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.