मुंबई/ ठाणे : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असून भाविकांनी शनिवारी मुंबई, ठाण्यातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील पदाधिकारी, कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीत व्यग्र होते. त्याच वेळी कोकणातील गावी जाण्यासाठी भाविकांचीही लगबग सुरू आहे.
गणेशोत्सवाला २७ ऑगस्ट रोजी सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने मुंबईमधील ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील पदाधिकारी- कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. गणेश कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तींवरून अखेरचा हात फिरविला जात असून मूर्तिकार आणि कारागिरांची धावपळ सुरू आहे. मंडपस्थळी सजावट करण्यासाठी कार्यकर्ते रात्र जागवत आहेत. त्याच वेळी गणेशोत्सवानिमित्त लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. गावी जाणाऱ्या भाविकांनी सजावटीचे साहित्य, नैवेद्याचे साखरफुटाणे, बत्ताशा आदी खरेदी करण्यासाठी लालबागमध्ये प्रचंड गर्दी केली होती. तसेच दादरसह मुंबईतील अन्य बाजारपेठा भाविकांच्या गर्दीने फुलल्या होत्या. सजावटीचे साहित्य, मखर साहित्य, कापड, विद्युत माळा, पूजेचे साहित्य खरेदी करण्यात येत होते.
ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसराला लागूनच असलेल्या शहरातील मुख्य बाजारपेठेत, तसेच कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि उल्हासनगरातील बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
ठाण्यात वाहतूक कोंडी
ठाणे : ठाणे स्थानक परिसरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढल्याने बसगाड्या व रिक्षांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली. कोंडीमुळे १५ मिनिटांच्या अंतरासाठी दीड ते दोन तास लागत असल्याने नोकरदार वर्ग हैराण झाला. बाजारपेठेला जोडणाऱ्या जांभळीनाका, तलावपाळी, राममारुती रोड, गोखले रोड याअंतर्गत मार्गांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.