Ghatkopar Goldcrest Business Park building Fire : मुंबईमधील घाटकोपर येथील गोल्डक्रेस्ट नावाच्या एका व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत. दरम्यान, काही लोक इमारतीत अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाची चिंता वाढली आहे.

घाटकोपर पश्चिमेकडील गोल्ड क्रेस्ट बिझनेस पार्क या व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली आहे. आगीचे लोळ इमारच्या वरपर्यंत दिसत असून अग्निशन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. फायर अलार्म वाजताच या इमारतीत काम करणारे अनेकजण इमारतीतून बाहेर पडले. तर काही जणांना अग्निशमन दलाने बाहेर काढलं. अजूनही अग्निशमन दल वेगवेगळ्या मजल्यावरील खिडक्यांना शिडी लावून त्या शिडीद्वारे अनेकांना बाहेर काढत आहेत.

गोल्ड क्रेस्ट ही पूर्णपणे व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीत अनेक कंपन्यांची कार्यालयं आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. अद्याप घटनास्थळावरून कुठलंही जीवितहानीचं वृत्त समोर आलेलं नाही. मात्र, इमारतीत अडकलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. लोक गुदमरतायत. अशा स्थितीत आग विझवणं किंवा इमारतीत अडकलेल्या सर्वांना तातडीने इमारतीबाहेर काढणं गरजेचं आहे.