मुंबई: घाटकोपर परिसरातील सराफाच्या दुकानात बुधवारी सकाळी शिरलेल्या तिघांनी दुकान मालकावर चाकूने हल्ला करून दुकानातील सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला. घाटकोपर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सहा पथके तैनात केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
घाटकोपरमधील गोळीबार रोड परिसरात बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. येथील दर्शन ज्वेलर्सचे मालक दर्शन मेटकरी यांनी सकाळी १० च्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान उघडले. त्यानंतर काही वेळातच दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून दुकानातील सोन्याचे दागिने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र दर्शन मेटकरी यांनी त्यांना विरोध करताच आरोपीनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये दर्शन मेटकरी गंभीर जखमी झाले.
आरोपीने दर्शन मेटकरी यांच्यावर हल्ला केल्यानंतर दुकानातील दागिने लुटून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दर्शन मेटकरी यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.