मुंबई: ऑनलाईन मागवलेली वस्तू अनेक दिवसानंतरही घरी न आल्याने त्याची तक्रार करणाऱ्या एका वृद्धाला एका भामट्याने तीन लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी वृद्धाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
घाटकोपरमधील एल.बी.एस. मार्ग परिसरात वास्तव्यास असलेले शिवपूजन सिंग (५९) यांनी आठ दिवसांपूर्वी मच्छर पळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राची ऑनलाइन खरेदी केली होती. मात्र अनेक दिवस उलटल्यानंतरही त्यांना ते यंत्र मिळाले नाही. त्यामुळे याबाबत तक्रार करण्यासाठी त्यांनी संबंधित ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीच्या ग्राहक प्रतिनिधीचा संपर्क शोधून काढला.
या संपर्क क्रमांकावर फोन केल्यानंतर त्यांना एका व्यक्तीने याबाबत तक्रार नोंदवून घेतल्याचे सांगितले आणि त्यांच्या बँकेची माहिती मागितली. सिंग यांनी तत्काळ बँकेची सर्व माहिती दिली. त्यानंतर आरोपीने सिंग यांचा मोबाइल क्रमांक बंद करून त्यांच्या खात्याला दुसरा नंबर जोडला.
त्यावरून आरोपीने सिंग यांच्या दोन्ही बँक खात्यातून तीन लाख रुपये काढून घेतले. मोबाइल बंद झाल्यानंतर ही बाब लक्षात येताच सिंग यांनी तत्काळ बँकेत धाव घेतली. यावेळी त्यांच्या बँक खात्याला दुसरा मोबाइल नंबर जोडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सिंग यांनी तात्काळ घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.