मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा गोखले पूल आणि अंधेरी पश्चिम येथे असलेला सी. डी. बर्फीवाला पूल परस्परांना जोडण्याचे काम प्रगतीपथावर असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या कामाची बुधवारी पाहणी केली. उर्वरित कामे जलदगतीने करून हा पूल लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, असे निर्देश भूषण गगराणी यांनी पालिका यंत्रणेला दिले.

गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असली तरी अंधेरी पश्चिम दिशेला असलेला बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी वरखाली झाली होती. त्यामुळे बर्फीवाला पूल बंदच ठेवावा लागला होता. त्यामुळे गोखले पूल व बर्फीवाला पूल जोडण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई आयआयटी आणि व्हिजेटीआय या संस्थांची मदत घेतली आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार हे दोन पूल जोडण्यासाठी जॅक लावून पुलाचा काही भाग वर खेचून पातळी समतल करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. मुंबई महानगरपालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली गोखले पुलाचे काम सुरू आहे. भूषण गगराणी यांनी बुधवारी या कामाची पाहणी केली. गोखले पूल प्रकल्पाच्या ठिकाणी कार्यरत अभियंत्यांशी आयुक्तांनी संवाद साधून उर्वरित कामे जलदरित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दोन्ही पूल जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मुंबईकरांसाठी हा टप्पा लवकरच खुला करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : कोकण रेल्वेने लावली पाच हजार रोपे

या पाहणी दौऱ्याच्या सुरुवातीला जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयुक्तांनी मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यान (हँगिंग गार्डन), सांताक्रुझ (पश्चिम) येथील लायन जुहू महानगरपालिका बाल उद्यान (एरोप्लेन गार्डन) येथे सकाळी भेट दिली. सांताक्रुझ येथील बाल उद्यानात गगराणी यांच्या हस्ते पुरातन गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण करण्यात आले. या दौऱ्याच्या वेळी पालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यानात व्यायामासाठी आलेल्या मुंबईकरांशी त्यांनी संवाद साधला. उद्यानात सुरू असलेल्या कामांची आयुक्तांनी माहिती घेतली. तसेच उद्यानात दररोज स्वच्छता करा, वाढलेल्या गवताची कापणी करा, उद्यानात साचणाऱ्या कचऱ्याची दैनंदिन विल्हेवाट लावा, उद्यानाच्या प्रवेशद्वारावर महिला सुरक्षा रक्षक नेमावेत, आदी सूचना त्यांनी संबंधितांना केल्या.

हेही वाचा : विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा: विद्यार्थ्यांना आक्षेपासाठी प्रश्न व उत्तर तालिका उपलब्ध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एरोप्लेन गार्डन’मध्ये पुरातन गोरख चिचेंच्या झाडांचे रोपण

सांताक्रुझ (पश्चिम) येथील लायन जुहू महानगरपालिका बाल उद्यान (एरोप्लेन गार्डन) येथे गगराणी यांच्या हस्ते पुरातन गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण करण्यात आले. गेल्या महिन्यात विकासकामांमुळे मुंबईतील तीन ठिकाणची गोरख चिंचेची झाडे हटवण्यात आली होती. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले होते. तेव्हा नवीन झाडांचे रोपण करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते.