मुंबई : राज्यात गत चार-पाच दिवसांपासून मुसळधार पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. पावसामुळे सुमारे ३५ हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतजमिनी खरवडल्या आहेत. घरे, जनावरांचे गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना राष्ट्रीय आपत्ती निधीच्या निकषांप्रमाणे (एनडीआरएफ) आर्थिक मदत दिली जाणार आहे.
राज्यात शनिवार ते सोमवार या काळात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यासह वीज पडून, पाण्यात बुडून, घराची भिंत कोसळून, झाड पडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. राज्यभरात आठ जनावरांचांही मृत्यू झाला आहे. राज्यभरातील सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या सर्व नुकसानग्रस्तांना राष्ट्रीय आपत्ती निधीतून मदत दिली जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
एनडीआरएफच्या १८ तुकड्या सज्ज
राज्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्यभरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या १८ तुकड्या सज्ज आहेत. त्यापैकी मुंबईत तीन, पालघरमध्ये एक, नागपूरमध्ये दोन आणि पुण्यातील मुख्यालयात एक पथक तैनात आहे. तर मुंबईत आणखी दोन, रायगडमध्ये एक, ठाण्यात दोन, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची सहा पथकेही राज्यभरात तैनात करण्यात आली आहेत.
दोन दिवसांत १९ कोटी भ्रमणध्वनी लघु संदेश मंत्रालयात राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या मदत कक्षातून २६ आणि २७ मे, या दोन दिवसांत पाऊस आणि विजा पडण्याच्या घटनेत एकूण ५२ पूर्वसूचना भ्रमणध्वनी लघु संदेशद्वारे पाठविण्यात आल्या. दोन दिवसांत एकूण १९.२२ कोटी भ्रमणध्वनी लघु संदेश पाठविण्यात आले आहेत. या शिवाय मंत्रालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू आहे.