मुंबई : ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम… गोविंदा रे गोपाळा… बोल बजरंग बली की जय… अशा घोषणा देत थरांचा रोमहर्षक थरार शनिवार, १६ ऑगस्ट रोजी मुंबईसह राज्यात पाहायला मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी आणि संबंधित मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय मंडळींकडून मुंबईत ठिकठिकाणी लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. मात्र फलकबाजीवर दिसणाऱ्या ‘लाख’मोलाच्या दहीहंडी उत्सवात प्रत्यक्षरित्या थरनिहाय किती रक्कम मिळणार? एवढेच बक्षीस दिले जाणार का ? याबाबत गोविंदांमध्ये संभ्रम आहे.

मुंबई शहर व उपनगर, ठाणे व आसपासच्या परिसरातील दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदा पथकांना लाखोंचे लोणी चाखायला मिळणार असून कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. या दहीहंडी उत्सवाची शहरातील चौकाचौकात व नाक्यानाक्यावर मोठ्या प्रमाणात फलकबाजी करण्यात येते. विविध समाजमाध्यमांवरही फलक अपलोड करण्यात येतात. या फलकांवर बक्षिसाची लाखोंच्या घरांमध्ये रक्कम नमूद करण्यात येते. मात्र प्रत्यक्ष दहीहंडी उत्सवाच्या दिवशी गोविंदा पथकांना एवढ्या रक्कमेची पारितोषिके देण्यात येतात का ? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनाही पडत असून थरनिहाय रक्कमेबाबत गोविंदांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.

‘आम्ही दहीहंडी उत्सव आमच्या आनंदासाठी साजरा करतो. विविध फलकावर दिसणारी लाखो रुपयांची आकर्षक दहीहंडी फलकावरच छान दिसते. ही सर्व गोविंदा पथकांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांची एकूण रक्कम असते. अनेक ठिकाणी थरनिहाय बक्षिसाच्या रक्कमेबाबत अस्पष्टता असते. तसेच दिवसभर फिरून मिळणारे बक्षिसरूपी मानधन हे गोविंदांसाठी लागणारी गाडी, जेवण, विमा आदी विविध खर्चाच्या निम्मेच असते. मुंबईसह राज्यातील अनेक मंडळे स्वतःच्या खिशातून पैसे टाकून सण साजरा करतात’, परळमधील गोविंदा पथकातील एका युवकाने सांगितले.

‘मानाची दहीहंडी, सन्मानाची दहीहंडी आणि थरनिहाय पारितोषिक फलकावर नमूद केले आहे, तेवढी बक्षीसरूपी रक्कम गोविंदा पथकांना देतो. महिला गोविंदांसाठी विशेष पारितोषिक व सन्मानचिन्हही देत आहोत. तसेच आम्ही गोविंदा पथकांना सात थर रचण्यास परवानगी दिली आहे. पूर्वनोंदणीची प्रक्रिया राबविल्यामुळे सर्व गोविंदा पथकांना थर रचण्याची संधी मिळते. मुंबईत विविध ठिकाणी गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळत असून दहीहंडी उत्सव उत्तरोत्तर वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत’, असे भाजपचे पदाधिकारी आणि परिवर्तन इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. संतोष पांडे यांनी सांगितले.

मुंबईतील ‘लाख’मोलाच्या काही दहीहंड्या…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यातर्फे काळाचौकी येथील अभुद्यनगरमधील शहीद भगतसिंग मैदानात दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून एकूण १५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

भाजप, मुंबई आणि परिवर्तन इंडिया फाऊंडेशनतर्फे वरळीतील जांबोरी मैदानात परिवर्तन दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ॲड. संतोष पांडे यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात मानाची दहीहंडी १ लाख २१ हजार १२१, वरळी विभागासाठी राखीव सन्मानाची दहीहंडी ९९ हजार ९९९, पाच थरांसाठी ५ हजार , सहा थरांसाठी ७ हजार आणि सात थरांसाठी ११ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

शिवसेना (शिंदे) विभाग क्र. २ चे विभागप्रमुख लालसिंह राजपुरोहित यांनी कांदिवली (पश्चिम) येथील आनंद नगर येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून फलकावर पारितोषिक ट्रॉफी व रोख रक्कम ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये नमूद करण्यात आली आहे.

शिवसेना (शिंदे गट) कांदिवली (पूर्व) विधानसभेतील प्रभाग क्र. २८ चे माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांनी दहीहंडी उत्सवाचे कांदिवली (पूर्व) येथील हनुमान नगरमधील महिंद्रा येलो गेटसमोर आयोजन केले आहे. या दहीहंडी उत्सवाच्या फलकावर बक्षिसाची एकूण रक्कम ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये नमूद करण्यात आली आहे.

शिवसेनच्या (ठाकरे) युवा सेनेचे वरळी विधानसभा विभाग अधिकारी संकेत सावंत यांच्यातर्फे वरळीतील श्रीराम मिल नाक्यावर पारंपरिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवात एकूण १ लाख ९८ हजार १९८ रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर (पश्चिम) येथील श्रेयस सिग्नलजवळ ‘भारतातील सर्वात मोठी दहीहंडी’ या टॅगलाईनखाली आयोजन केले आहे.