मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चहुबाजूंनी टीकेचे मोहोळ उठल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरुगोविंद सिंह या महापुरुषांचा अपमान करण्याची कल्पना मी स्पप्नातही करू शकत नाही, अशी सारवासारव केली आहे. तसेच सद्य:स्थितीत आपण काय ते मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यपालांनी ६ डिसेंबर रोजी  शहा यांना पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील एका विद्यापीठातील माझ्या संपूर्ण भाषणातील एक अंश बाजूला काढून काही लोकांनी टीकेचे लक्ष्य बनवले आहे. मी विद्यार्थ्यांना म्हणालो होतो की, आम्ही शिकत असताना काही विद्यार्थी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, तर काही विद्यार्थी नेताजी सुभाषचंद्र बोस आदींना आपले आदर्श मानत होते. तरुण पिढीला वर्तमानातील आदर्शाबद्दल बोलताना महाराष्ट्राच्या संदर्भात मी सांगितले की, आजच्या संदर्भात डॉ. भीमराव आंबेडकरांपासून ते नितीन गडकरी यांच्यापर्यंत अशी उदाहरणे आहेत. याचा अर्थ विद्यार्थी डॉ. ए.पी.जी अब्दुल कलाम, डॉ. होमी भाभा आदी कर्तव्यशील पुरुषांचे आदर्श घेऊ शकतात. जगात भारताचे नाव उंचावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आदर्श मानू शकतात. याचा अर्थ महापुरुषांचा अपमान केला असे होत नाही,  किंबहुना हा तुलना करण्याचाही विषय होऊ शकत नाही. 

राज्यपाल आपल्या पत्रात पुढे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे मानिबदू आहेत. मी या वयात व करोना महासाथीचा कहर असताना आणि मोठे मोठे लोक घरातून बाहेर पडत नव्हते, अशा परिस्थितीत शिवनेरी, सिंहगड, रायगड व प्रतापगडाला भेट देऊन दर्शन घेतले होते. माता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजाचे दर्शन घेणारा गेल्या दहा वर्षांतील मी एकमेव राज्यपाल आहे. शिवाजी महाराज कायमस्वरूपी आमचे प्रेरणास्रोत आहेत, असे माझे म्हणणे होते.

..अनिच्छेने राज्यपाल झालो

आपली इच्छा नसताना राज्यपालपद स्वीकारल्याचेही कोश्यारी यांनी पत्रात नमूद केले आहे. २०१९ ची निवडणूक लढवायची नाही तसेच राजकीयपदापासून दूर राहण्याचे मी जाहीर केले होते, हे आपणास माहीतच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे महाराष्ट्रासारख्या महान राज्याचे राज्यपालपद मी स्वीकारले आहे. आपणास हेही माहीत आहे की, माझ्याकडून काही चूक झाली तर, त्वरित खेद व्यक्त करण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही. मुगल काळात शौर्य, त्याग, बलिदान याचे उदाहरण असलेले महाराणा प्रताप, श्री गुरुगोविंद सिंह व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांचा अपमान करणे याची मी स्वप्नात देखील कल्पना करू शकत नाही, असे  म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guide governor expectations in letter written to amit shah after controversial statement ysh
First published on: 13-12-2022 at 00:02 IST