‘वेदान्त-फॉक्सकॉन’यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आले आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू झाली आहे. तर, विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांना टोला लगावल्याचं दिसून आलं आहे. “नुसती गुजरातच्या विरोधात भाषणं देऊन, गुजरातला हरवता येत नाही. त्यासाठी तशा योजना असाव्या लागतात.” असं फडणवीस म्हणाले आहेत. मुंबईत लघु उद्योग भारतीच्या प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, “अनेकवेळा गुजरातची चर्चा होते आणि अलीकडच्या काळात जरा जास्त चर्चा व्हायला लागली आहे. या ठिकाणी सगळ्यांना माहिती असलं पाहिजे म्हणून मी हे सांगतोय की, महाराष्ट्राकडे साधरण २०१३-१४ मध्ये परकीय गुंतवणूक ही सहा बिलीयन डॉलर्स होती. जी २०१७ मध्ये वाढून २० बिलीयन डॉलर्स पर्यंत पोहचली. याचा परिणाम म्हणजे आपण पहिल्या क्रमांकावर तर गेलोच, परंतु आपल्या मागे जी राज्य होती ज्यामध्ये दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या सर्वांची मिळून बेरीज १३ बिलियन डॉलर्स होती आणि एकट्या महाराष्ट्राची २० बिलियन डॉलर्स होती. हे सहा बिलियन पासून आपण २६ बिलियन पर्यंत वर नेलं होतं आणि सातत्याने आपण पहिल्या क्रमांकावर होतो. दुर्दैवाने गेल्या दोन वर्षांत आपला पहिला क्रमांक घसरला आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला. गुजरात राज्य ३ बिलियनवरून २३ बिलियनवर पोहचले आणि आम्ही २६ बिलियनवरून १८ बिलियनवर आलो. त्यामुळे नुसती गुजरातच्या विरोधात भाषणं देऊन, गुजरातला हरवता येत नाही. त्यासाठी तशा योजना असाव्या लागतात.”

पाहा व्हिडीओ –

शेवटी उद्योजक तुमच्याकडचं वातावरण कसं आहे हे बघत असतो –

याचबरोबर “मला आनंद आहे की पाच वर्ष सातत्याने गुजरातला मी मागे ठेवलं होतं आणि महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं होतं. आता जे बोलताय त्यांनीच पुन्हा एकदा गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेलं आणि महाराष्ट्राला खाली आणलं. म्हणून मला असं वाटतं की शेवटी उद्योजक तुमच्याकडचं वातावरण कसं आहे हे बघत असतो.” असंही यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं आहे.

लघु उद्योग हा अर्थव्यवस्थेचा कणा –

“आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा हा लघु उद्योग आहे. सर्वात जास्त रोजगार निर्मिती ही लघु उद्योगाच्या माध्यमातून होते. विशेषता आपण जेव्हा मोठ्या उद्योगाचा विचार करतो. त्यावेळी त्या मोठ्या उद्योगालाही संपूर्ण पूरकता ही लघु उद्योगामुळे येते. म्हणून पंतप्रधान मोदींनी लघु उद्योगाला फार जास्त महत्व दिलं आहे. करोना काळातही विविध योजनाच्या माध्यमातून या उद्योगला पाठबळ देण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्रातही आमचा हाच प्रयत्न आहे.”