लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गुंदवली – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यानच्या ३.४ किमी लांबीच्या ‘मेट्रो ७ अ’ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. एमएमआरडीएने या मार्गिकेच्या कामाला वेग दिला असून या मार्गिकेतील एक महत्त्वाचा टप्पा गुरुवारी यशस्वीपणे पूर्ण झाला.

या मार्गिकेतील २.५०३ पैकी १.६४७ किमी लांबीचे भूयारीकरण ‘दिशा’ नावाच्या टनेल बोरिंग यंत्राने पूर्ण केले. ही भूयारीकरणाची जबाबदारी पार पाडून ‘दिशा’ गुरुवारी भूर्गभातून यशस्वीपणे बाहेर आली. त्यावेळी प्रकल्पस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि एमएमआरडीएचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. आतापर्यंत या प्रकल्पाचे ५९ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

‘दिशा’ सप्टेंबर २०२३ मध्ये भूगर्भात

एमएमआरडीएच्या १४ मेट्रो प्रकल्पातील ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’चा ‘गुंदवली – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ’ असा विस्तार करण्यात येत आहे. ‘मेट्रो ७ अ’ ही मार्गिका ३.४ किमी लांबीची असून यापैकी ०.९४ किमीचा भाग उन्नत आणि २.५०३ किमी लांबीचा मार्ग भूयारी आहे. तसेच एक मेट्रो स्थानक भुयारी आणि एक मेट्रो स्थानक उन्नत आहे. या विमानतळाला जोडणाऱ्या ‘मेट्रो ७ अ’ मार्गिकेतील भूयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.

त्यानुसार २.५०३ किमीपैकी १.६४७ किमीच्या भूयारीकरणासाठी १ सप्टेंबर २०२३ मध्ये ‘दिशा’ टिबीएम यंत्र लॉन्चिंग शाफ्टमध्ये अर्थात ३० मीटर खोल विहिरीतून भूगर्भात सोडण्यात आले होते. त्यानुसार ‘दिशा’ने पश्चिम द्रुतगती महामार्ग – विमानतळ दरम्यान १.६४७ किमी लांबीचे भूयारी १७ महिन्यांत पूर्ण केले आणि गुरुवार, १७ जानेवारी रोजी ‘दिशा’ टीबीएम बाहेर आले. ६.३५ मीटर व्यासाचा बोगदा तयार करून ‘दिशा’ टीबीएम यशस्वीपणे बाहेर आले आहे. या ऐतिहासिक क्षणी मुख्यमंत्री प्रकल्प स्थळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या कामाचे कौतुक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई विमानतळाला जोडणार

मेट्रो ७ अ च्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने आता या मार्गिकेचे काम वेग घेणार आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूचे भूयारीकरणही लवकरच पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. दरम्यान, आतापर्यंत या मार्गिकेचे ५९ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाला आता वेग देऊन शक्य तितक्या लवकर ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असणार आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास दहिसर – बोरिवली वा पश्चिम द्रुतगती मार्गावरून मुंबई विमानतळावर जाणे सहज सोपे होणार आहे. त्यामुळे ही मार्गिका अत्यंत महत्त्वाची आहे. पुढे ही मार्गिका ‘मेट्रो ८’च्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई विमानतळावरून मेट्रोने नवी मुंबई विमानतळावर पोहचणेही सोपे होणार आहे.