मुंबई: अमलीपदार्थ तस्करीबाबत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या दूरध्वनीच्या तपासणीनंतर शिवाजी नगर पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडला. दूरध्वनीवरून माहिती मिळाल्यानंतर शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने तात्काळ कारवाई करून गुटखा जप्त केला.
शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षक नंदराम लांघी व पथक बुधवारी कार्यरत असताना एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शिवाजी नगर, गोवंडी येथील मार्ग क्रमांक ४ वरील प्लॉट नं. ३१ येथे अमली पदार्थाचा टेम्पो आल्याची माहिती या नागरिकाने दिली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांनी तात्काळ निर्भया पथकाला घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले.
लांघी व त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तेथे काही गोण्या आढळल्या. तेथे अब्दुल वाहब अब्दुल खालीद शेख (३४) उभा होता. या गोणींबाबत विचारणा केली त्यात विविध कंपन्यांचे सुगंधी पानमसाले, गुटखा व तंबाखू असल्याचे त्याने सांगितले. ही माहिती मिळताच निर्भया पथकाने तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यामुळे पोलीस ठाण्यातील इतर अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व गोणी जप्त केल्या.
त्यात एक लाख ९८ हजार रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा सुगंधी पानमसाला, गुटखा व तंबाखू होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३ व अन्न सुरक्षा अधिनियम २६ (२), ३० (२) (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नागरिकाच्या जागरुकतेमुळे प्रकार उघड
एका जागरूक नागरीकाने पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. संबंधित व्यक्ती त्या ठिकाणाहून जात असताना काही व्यक्ती टेम्पोमधून संशयीतरित्या गोणी उतरवत असल्याचे आढळून आले. त्यावेळी त्या व्यक्तीला संशय आल्याने त्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. अशा प्रकारे अमली पदार्थ तस्करी, साठवणूक व विक्री याबाबतची माहिती मिळाल्यास तात्काळ १०० अथवा ११२ या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या तस्करी प्रकरणातील इतर आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याद्वारे इतर ठिकाणीही छापे टाकण्यात आले.