मुंबई : मध्य रेल्वेतून प्रवास करताना दररोज अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. तसेच, अवेळी धावणाऱ्या लोकलमुळे कार्यालयात पोहचण्यास विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. हार्बर मार्गावर प्रवाशांना आजही असाच कटू अनुभव आला. मुंबईमधील प्रवाशांना विविध समस्यांना तोड देत प्रवास करावा असतानाच मध्य रेल्वे प्रशासन मात्र बिहारचे गुणगान गाण्यात व्यस्त होते. हार्बर मार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या तांत्रिक बिघाडाची माहिती प्रवाशांना समाज माध्यमावर देण्याऐवजी मध्य रेल्वे बिहारच्या जाहिरातबाजीत व्यस्त असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

मध्य रेल्वे बिहारच्या जाहिरातबाजीत व्यस्त

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दररोज १,८१० लोकल फेऱ्या चालवण्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात दररोज अनेक फेऱ्या रद्द करण्यात येत असल्याने मध्य रेल्वेचा हा दावा फोल ठरत आहे. तसेच, बहुतांश सर्वच लोकल फेऱ्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब होत आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकलच्या वेळापत्रकाचे तीन-तेरा वाजत आहेत. असे असताना, प्रवाशांना वेळापत्रकाबाबत, बिघाडाबाबत माहिती देण्याऐवजी मध्य रेल्वेचे जनसंपर्क कार्यालय बिहारच्या जाहिरातबाजीत व्यस्त आहे.

हार्बर मार्गिका विस्कळीत

हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी सकाळी लोकल नियोजित वेळापत्रकाच्या तुलनेत ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. सकाळपासून लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने, प्रवाशांना कार्यालयात जाण्यास उशीर झाला.

‘विकसित भारत, विकसित बिहार’ पोस्टचा भडिमार

हार्बर मार्गिकेवरील लोकल तांत्रिक बिघाडामुळे विलंबाने धावत असल्याबाबत मध्य रेल्वेकडून कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. मध्य रेल्वेच्या ‘एक्स’ ॲपवरून प्रवाशांना कोणत्याही स्वरूपाची बिघाडाची माहिती देण्यात आली नाही. सध्या फक्त ‘विकसित भारत, विकसित बिहार’ याबाबत पोस्टचा भडिमार करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुंबई या ‘एक्स’ खात्यावरूनही कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या खात्यावरही ‘विकसित भारत, विकसित बिहार’ याबाबत पोस्ट आणि रिपोस्ट दिसून येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल, बेलापूर, वाशीवरून लोकल प्रवास रखडला

शुक्रवारी सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्ग विस्कळीत झाला. त्यामुळे लोकल सेवा एका मागे एक थांबल्या होत्या. बराच वेळ लोकल एकाच ठिकाणी उभ्या होत्या. त्यामुळे प्रवासी प्रचंड वैतागले होते. काही वेळानंतर लोकल संथगतीने धावू लागल्या. हळूहळू पनवेल, बेलापूर, वाशीवरून मुंबईच्या दिशेने लोकल मार्गस्थ होत होत्या. नियोजित वेळापत्रकाच्या तुलनेत लोकल ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. बेलापूर-सीएमएमटी, पनवेल-वडाळा रोड, पनवेल-सीएसएमटी, वाशी-सीएसएमटी यादरम्यानच्या लोकल विलंबाने धावत होत्या. तर, काही लोकल रद्द करण्यात आल्या. परंतु, याबाबत ‘एक्स’ वरून कोणतीही माहिती प्रवाशांना देण्यात आली नाही. लोकलच्या बिघडलेल्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला.