मुंबई: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी कुळकायदा, कमाल जमीन धारणा कायदा आणून जमीनदारांकडील लाखो एकर जमीन सर्वसामान्य गरीब जनतेला दिली. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतून लाखो भूमिहिनांना जमीन मिळवून दिली. आता मात्र चक्र उलटे फिरले असून मोदी सरकार अदानींना गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
कल्याण येथील अदानी सिमेंट कंपनीला स्थानिकांचा विरोध असून त्याविरोधात आंदोलन सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईचे वितानतळ, धारावी, मदर डेअरी, देवनारची जागा मोदी सरकारने लाडक्या मित्राला दिली, त्यानंतर वाढवण बंदराच्या नावाखाली पालघर देऊन टाकले व आता कल्याणमधील ४५० एकर जमीन राष्ट्रीय शेठच्या सिमेंट कंपनीसाठी दिली.
फक्त जमीनच दिली नाही तर या सिमेंट कंपनीसाठी पर्यावरणासह सर्व नियमच बदलून टाकले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. ही सिमेंट कंपनी स्थानिकांच्या जीवावर उठलेली असून स्थानिकांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी, दबाव आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवला आहे. या प्रश्नी काँग्रेस पक्ष विधानसभेतही आवाज उठवेल, असे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई व कल्याणचे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते पगारे मामा यांच्यावर हल्ला करणारी प्रवृत्ती ही मनुवादी आहे. या मनुवादी वृत्तीला न घाबरता चोख उत्तर दिले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हात लावण्याचे धाडस कोणी केले तर त्यामागे सर्वशक्तिनिशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही केली.