मुंबई : गर्भवती महिलांच्या सुविधेसाठी राज्यात सुरू असलेली १०२ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेची सुविधा काहिशी विस्कळीत झाली होती. जूनमध्ये केंद्राकडून मदत मिळाल्यामुळे थकीत वेतन, इंधन देयके दिल्यामुळे आता १०२ रुग्णवाहिकेची सेवा सुरळित झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.
शिवाजीराव गर्जे यांनी राज्यभरात १०२ रुग्णवाहिका सेवा विस्कळीत झाल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जननी सुरक्षा कार्यक्रमाच्या अंतर्गत गर्भवती महिलांच्या सुविधेसाठी १०२ क्रमाकांच्या तीन हजारांहून जास्त रुग्णवाहिका राज्यात कार्यरत आहेत. पण, गत सहा महिन्यांपासून रुग्णवाहिका चालकांना वेतन नाही. इंधनाची देयके थकल्यामुळे ही सेवा विस्कळीत झाला आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी सरकार काय उपाययोजना करीत आहे, असा सवालही उपस्थित केला होता.
राज्यात १०२ क्रमाकांच्या ३३३२ रुग्णवाहिकामार्फत गर्भवती महिला, बालकांना व रुग्णांना सेवा दिली जाते. यापैकी १११७ रुग्णवाहिकांवर राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या वतीने वाहन चालक पुरविले जातात. सन २०२५-२६ मध्ये या योजनेचा शेवटचा हप्ता केंद्र सरकारकडून मिळाला नव्हता. त्यामुळे वाहन चालकांचे वेतन थकले होते. रुग्णवाहिकेची इंधन देयकेही थकली होती. जून महिन्यात केंद्र सरकारने थकलेला हप्ता दिला आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व जिल्ह्यांना वाहन चालकांना वेतन देण्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता १०२ रुग्णवाहिकेची सेवा पुर्ववत झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.