Mumbai Weather Today : मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून संततधार पाऊस कोसळत आहे. शहरातील परळ, कुलाबा, वरळी भागात पावसाचा जोर वाढला आहे. उपनगरातील वांद्रे, अंधेरी परिसरात देखील पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील दोन – तीन दिवस पाऊस सक्रिय राहील, असाही अंदज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शहर आणि उपनगरांत मागील दोन – तीन दिवसांपासून हजेरी लावली आहे.
दोन दिवसांपासून पाऊस सक्रिय
पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे मुंबईतील उकाडा काहीसा कमी झाला आहे. याचबरोबर पाऊसही संततधार कोसळत आहे. यामुळे जुलै महिन्याची सरासरी पाऊस गाठेल अशी आशा पल्लवित झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पाऊस सरासरी गाठेल की नाही याबद्दल शंका होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सरासरी गाठता येईल.
कमी दाब क्षेत्र
उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही हवामान प्रणाली ठळक होण्याची शक्यता असून, पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, सिरसा, मेरठ, पाटणा, जमशेदपूर, दिघा येथे आहे. कमी दाबाचा पट्टा उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच विदर्भापासून कमी दाबाच्या केंद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी
हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत आज अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, वर्धा, नागपूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर पालघर, नाशिक घाट परिसर, सातारा, कोल्हापूर, अमरावती, हिंगोली, नांदेड, या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच वाशिम, अकोला, यवतमाळ, परभणी, बुलढाणा या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे.
उद्या मोठी भरती
समुद्राला शुक्रवारी आणि शनिवारी मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे, तसेच यासंदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. समुद्राला २६ जुलै रोजी सर्वात मोठी भरती येणार असून ४.६७ मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत.