मुंबई : राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान र्पुढील पाच दिवस कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर पावसाने जोर वाढला आहे. कोकणात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्या तुलनेत विदर्भात फारसा पाऊस पडलेला नाही. पुढील पाच दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसतात. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ६ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ६ मिमी पावसाची नोंद झाली.

त्याचबरोबर अकोला, गोंदीया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील दोन तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. दरम्यान, हवामान विभागाने पुढील आठवड्यांचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्र व कोकणात गुरुवारपर्यंत बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतरच्या आठवड्यात (२७ जून ते ३ जुलै) पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात, विदर्भात आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. तिसऱ्या आठवड्यात (४ ते १० जुलै) विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतरच्या आठवड्यात (११ ते १७ जुलै) संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मोसमी वाऱ्यांनी देशाचा बहुतांश भाग व्यापला आहे. मोसमी वाऱ्यांनी रविवारी संपूर्ण लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा काही भाग आणि पंजाबच्या काही भागात वाटचाल केली. त्यानंतर सोमवारी मोसमी वारे त्याच भागात स्थिरावले होते. पुढील दोन तीन दिवसांत पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिरचा उर्वरीत भाग, हरियाणा, चंडीगढ आणि राजस्थानच्या काही भागात मोसमी वारे वाटचाल करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.