अंमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी गोरेगाव परिसरात बुधवारी रात्री उशीरा आलेल्या एका तरूणाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या तरुणाकडून २७० ग्रॅम उच्च प्रतीचे हेरॉइन आणि एक दुचाकी जप्त केली. अहमद अब्दुल शेख (२४) असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>अफजलखानाची कबरही हटवणार का? नितेश राणे म्हणाले, “तुम्ही झोपेत असताना ज्याप्रकारे…”

गोरेगाव येथे काहीजण अंमलीपदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दिडोंशी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे दिंडोशी पोलीस ठाण्यातील अतिरिक्त पोलीस निरीक्षक सूरज राऊत, पोलीस अंमलदार अभय जाधव, किरण बोडके, दिवल दांडेकर, राहुल घाडगे, महादेव पवार यांनी या परिसरात पाळत ठेवली होती. गोरेगाव येथील अरुणकुमार वैद्य मार्ग, रत्नागिरी जंक्शनजवळ बुधवारी रात्री १२.३० च्या सुमारास अहमद शेख आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे २७० ग्रॅम हेरॉईन सापडले. या हेरॉइनची किंमत एक कोटी दहा लाख रुपये आहे. हेरॉईनसह त्याची दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली. त्याच्याविरुद्ध अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यात रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heroin worth rs 1 crore seized in goregaon mumbai print news amy
First published on: 11-11-2022 at 13:37 IST