मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणात पारपत्रासंदर्भातील जामिनाची अट शिथिल करण्याची अभिनेत्री रिया चक्रवर्तीची मागणी उच्च न्यायालयाकडून मान्य करण्यात आली. तसेच, केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) रियाला तिचे पारपत्र कायमस्वरुपी परत करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणातील इतर आरोपींनाही अशाच प्रकारच्या सवलती मिळाल्या आहेत. चक्रवर्ती हिने खटल्यादरम्यान, तपास यंत्रणाना वेळोवेळी सहकार्य केले. परवानगी मिळालेल्या प्रत्येक परदेशी दौऱ्यानंतर ती भारतात परतली. तिने कधीही जामिनाच्या अटींचे उल्लंघन केलेले नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकलपीठाने उपरोक्त आदेश देताना नोंदवले. खटल्याच्या सुनावणीवेळी तिच्या उपलब्धतेवर शंका उपस्थित करणे अयोग्य असल्याचे निरीक्षणही एकलपीठाने नोंदवले. तसेच खटल्याच्या सर्व तारखांना उपस्थित राहणे, परदेशात जाण्यापूर्वी सरकारी वकिलांना संपूर्ण प्रवास कार्यक्रम, वास्तव्य असलेल्या हॉटेलचा पत्ता आणि विमान प्रवासाची माहिती किमान चार दिवस आधी देणे, संपर्क क्रमांक देणे अशा अटींवर याचिका मंजूर केली.

तत्पूर्वी, रिया हिला व्यावसायिक कामासाठी म्हणजेच चित्रिकरणासाठी वारंवार परदेशात जावे लागते. परंतु, प्रत्येक दौऱ्यादरम्यान, अशाप्रकारे अर्ज करावा लागतो. परिणामी, कामाच्या ठिकाणी जाण्यास नेहमीच विलंब होतो, असा दावा रियाने याचिकेत केला होता. तसेच, रिया हिला जामिनाच्या सर्व अटींचे पालन केले असून तिला पारपत्र परत करण्यात यावे, अशी मागणीही तिने केली होती. तर रिया ही एक सेलिब्रिटी आहे म्हणून तिला विशेष वागणूक मिळू शकत नाही, ती फरारी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा दावा करून एनसीबीने तिच्या याचिकेला विरोध केला होता.