मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपालकृष्ण गोखले पूल एका महिन्यापूर्वी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, रस्त्यावर झोपणाऱ्या बेघरांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोखले पुलावरील एस. व्ही जंक्शन येथे बेघरांनी अतिक्रमण करून पुलाचा झोपण्यासाठी वापर सुरू केला आहे. परिणामी, या ठिकाणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून त्याबाबत पालिकेवर टीकाही केली जात आहे.
गोपाळकृष्ण गोखले पुल जीर्ण झाल्यामुळे २०१८ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पुनर्बांधणीतील रखडपट्टीमुळे अनेक वर्ष नागरिकांना नवीन पुलाची प्रतीक्षा लागली होती. पुलाची पुनर्बांधणी करताना गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडण्यासाठी उंची वाढवण्यात आली होती. मात्र, दोन्ही पुलंच्या उंचीत अंतर पडल्याने काम आणखी रखडले. त्यानंतर, पुलाची उंची समतल करण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांची मदत घेऊन कामाला सुरुवात करण्यात आली. पण विविध कारणांमुळे त्यात अडचणी आल्या. दरम्यान, महापालिकेच्या कामकाजावर टीकाही करण्यात आली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ११ मे रोजी पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुनर्बांधणीपासून कायमच चर्चेत राहिलेला हा पूल बेघरांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मुंबईत रस्त्यांकडेला अनेक बेघरांनी अनधिकृत झोपड्या बांधल्या आहेत. अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी अनेक ठिकाणच्या पदपथांवर जागाच शिल्लक नाही. आता नव्याने बांधण्यात आलेल्या गोखले पुलावर देखील अतिक्रमण झाले आहे. या पुलावरील एस. व्ही जंक्शन येथील रस्त्याचा बेघर झोपण्यासाठी आसरा घेत आहेत. रस्त्याकडेला आठ – दहाजण झोपल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरू लागताच महापालिकेच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. या पुलावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलीसांनी अद्याप उपाययोजना का केल्या नाहीत, या ठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.