Houses Sale In Navratr 2025 मुंबई : सप्टेंबरअखेरपर्यंत नोंदवल्या गेलेल्या १२ हजार घरांपैकी अर्धी घरे म्हणजे सहा हजार २३८ घरे नवरात्रींच्या कालावधीत (२२ सप्टेंबर ते १ ॲाक्टोबर) विकली गेली आहेत. आतापर्यंत नवरात्रीत सर्वाधिक घरविक्रीची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत पाच हजार १९९ घरविक्री झाली होती. ही वाढ २० टक्के असल्याचे दिसून येते.

‘नाईट फ्रॅंक’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. नाईट फ्रॅंकने मुंबईतील घरविक्री तौलनिक अभ्यास या अहवालात केला आहे. यानुसार गेल्या काही महिन्यांत घरविक्रीत सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. एक कोटीपर्यंतच्या घरांना मुंबईत चांगली मागणी आहे. त्याचवेळी पाच ते दहा कोटी किमतीच्या घरांचीही आता विक्री होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. खरेदीदारांकडून छोट्या आकाराच्या एक ते दोन कोटी रुपये किमतीच्या टूबीएचके घरांनाही चांगली मागणी असून सध्या दहा टक्के रक्कम भरुन घर नोंदणीवर अनेकांचा भर दिसून येत आहे.

यंदा घरविक्रीमुळे शासनाच्या महसुलातही १७ टक्के वाढ झाली आहे. नवरात्रींच्या काळात प्रत्येक दिवशी सरासरी ६२४ घरविक्री नोंदली गेली आहे. २०२४ मध्ये नवरात्रींच्या काळात सरासरी ५७८ घरांची विक्री झाली होती. आतापर्यंत सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदाच १२ हजारहून अधिक घरविक्री होण्यामागे नवरात्रींतील घरविक्री कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद आहे. २०२३ मध्ये नवरात्रींच्या कालावधीत चार हजार ५९४ घरविक्री झाल्याचे नमूद आहे.

पितृपक्षाच्या काळातही घरांच्या विक्रीत गेल्या वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. श्राद्धाच्या काळात मुंबईत तीन हजार ३६८ घरांची विक्री झाली. २०२४ च्या तुलनेत (३२१६) त्यात पाच टक्के वाढ झाली आहे. २०२३ मध्ये तीन हजार ३५३ घरांची विक्री झाली होती.

सप्टेंबर किंवा ॲाक्टोबर महिन्यात नवरात्री, दसरा आणि दिवाळीत घरांची विक्री अधिक होते हा आतापर्यंतचा अनुभव आहे. पितृपक्षाच्या काळातही घरविक्री होत असली तरी ते प्रमाण आतापर्यंत तसे कमीच आहे. मात्र नवरात्रीत प्रामुख्याने घरविक्री अधिक होते, याकडे नाईट फ्रॅंकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले. स्थिर व्याजदर, वस्तू व सेवा करातील कपातीमुळे कमी झालेला बोजा व काही प्रमाणात छोट्या घरांच्या परवडणाऱ्या किमती याच बरोबर काही महागड्या घरांनाही खरेदीदारांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरात तीन लाख ४० हजार घरे रिक्त!

मुंबईत घरविक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो. त्यातुलनेत मुंबई महानगर परिसरातील घरांना खरेदीदार लाभलेला नाही. मुंबई महानगरात सुमारे तीन लाख ४० हजार घरे रिक्त असल्याचे मे २०२५ मध्ये जारी करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.