मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४ हजार ६५४ घरांसाठीच्या (१४ भूखंडांसह) सोडतीतील अर्जदारांनी ठाण्याऐवजी नवी मुंबईतील २० टक्क्यांतील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. २० टक्क्यांतील घरांसाठीच्या ४६ हजार अर्जापैकी १३ हजार ४२४ अर्ज घणसोलीतील गामी इम्फोटेक समूहातील घरांसाठी आले आहेत. येथील एका घरामागे सरासरी ६७१ अर्ज सादर झाले. तर, यापाठोपाठ एका घरामागे सरासरी ५१६ अर्ज याप्रमाणे सानपाडय़ातील ‘गुडविल’ प्रकल्पातील घरांसाठी १२ हजार ८९९ अर्ज सादर झाले. त्यामुळे १० मे रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीत या दोन्ही ठिकाणच्या घरांसाठी मोठी स्पर्धा  आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीतील स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार सोडतीसाठी एकूण ४८ हजार ९३२ अर्ज अनामत रकमेसह सादर झाले आहेत. मात्र, यातील ९३.५० टक्के अर्थात अंदाजे ४६ हजार अर्ज केवळ २० टक्के योजनेतील १ हजार ४५६ घरांना आले आहेत. यावरून अर्जदारांनी म्हाडा गृहप्रकल्पातील आणि पंतप्रधान आवास योजनेतील ३ हजार १९८ घरांना नाकारले आहे. या ३ हजार १९८ घरांसाठी केवळ साडेसहा टक्के अर्ज सादर झाले. 

राज्य सरकारच्या २० टक्के सर्वसमावेश योजनेअंतर्गत कोकण मंडळाला घणसोलीतील ‘मे. श्री गामी इन्फोटेक्ट’ समूहातील २० आणि सानपाडा, सेक्टर ८ मधील ‘मे. गुडविल’ समूहाच्या प्रकल्पातील युनिटी इमारत क्रमांक १ मधील २५ घरे उपलब्ध आहेत. गामी प्रकल्पातील घरे ४२.४९२ चौसर मीटरची असून अल्प गटातील या घरांची विक्री किंमत २३ लाख ९४ हजार ९०० रुपये  आहे. गुडविलमधील घरे ३२.६३ ते ३४.५८ चौरस मीटरची असून अल्प गटातील या घरांच्या किमती रु.१६ लाख ५८ हजार ९०० ते रु. १७ लाख ५७ हजार ७०० अशा आहेत.  घणसोलीतील घरांना सर्वाधिक १३ हजार ४२४ अर्ज दाखल झाले आहेत.

कल्याणमधील सदनिकांसाठी ३५९ अर्ज

कोकण मंडळाच्या सोडतीतील २० टक्के योजनेत सर्वाधिक ३१२ घरे ही कल्याण येथील दावडी गावातील रिजन्सी निर्माण प्रकल्पातील आहेत. मात्र, या घरांना सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे.