महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी अटकपूर्व जामीन याचिकेवर युक्तिवाद केला. यावेळी हृषिकेशला अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. हृषिकेश देशमुख यांना कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तसेच ते तपासात सहकार्य करण्यास तयार होते, त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात यावे, असा युक्तीवाद त्यांनी केला.

“जर सर्वोच्च न्यायालय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांना घोषित गुन्हेगार असूनही अटकेपासून संरक्षण देऊ शकते, तर सत्र न्यायालय देखील काहीच चूक नसलेल्या हृषिकेश देशमुख यांना संरक्षण देऊ शकते,” असं ते म्हणाले. जर हृषिकेशला अटकेपासून संरक्षण मिळाले तर ते ईडीसमोर हजर होईल, असं वकिलांनी सांगितलं. ईडीने यापूर्वी तीन वेळा त्याला समन्स बजावले आहे.

“सर्वोच्च न्यायालय घोषित गुन्हेगार असलेल्या परम बीर सिंग यांना दिलासा देत आहे. त्यांच्यावर खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची अनेक एफआयआरमध्ये नोंद आहे. मग हृषिकेशला संरक्षण का दिले जाऊ शकत नाही? त्यांच्याविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही, गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो एक निष्पाप नागरिक आहे,” असा युक्तीवाद सिंग यांनी केला. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण देऊनही कामावर रुजू न झाल्याने आणि महाराष्ट्रात परत न आल्याने परमबीर सिंग यांना या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने निलंबित केले होते.

मात्र, तपास यंत्रणेचे म्हणणे ऐकल्यानंतरच आदेश देऊ, असे सांगून न्यायालयाने कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला. “आम्ही सर्वोच्च न्यायालय नाही. एक लहान न्यायालय आहे. आम्ही संरक्षण दिले तरी उद्या १२ वाजता त्यांना ईडी उच्च न्यायालयाकडून या आदेशावर स्थगिती मिळवेल. तुम्ही कोर्टात तरतुदी दाखवा आणि आम्ही तसा ऑर्डर पास करू. हे प्रकरण किचकट आहे. विरोधी पक्षाकडून त्यांची बाजू मांडली जाईल. कदाचित ते अशा गोष्टी कोर्टात सांगतील ज्या तुम्ही सांगितल्या नसतील,” असं विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे म्हणाले.