हवामान विभागाचा अंदाज; शेतकऱ्यांना पीके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
मुंबई/ पुणे : नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असतानाच १८ ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
१८ ते २० ऑक्टोबर दरम्यान पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्य़ातील काही भागांत ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर नाशिक, धुळे,
जळगाव आणि नगर जिल्ह्य़ातील काही भागांत १९ ते २० ऑक्टोबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.
शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन
कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत लोकांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि विजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पाऊस कशामुळे?
मोसमी वारे परतले असले, तरी सध्या अरबी समुद्रातील स्थितीमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्र ते कर्नाटक किनारपट्टीच्या दरम्यान चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. उत्तर श्रीलंका ते मध्य अरबी समुद्रादरम्यान पावसाला पोषक द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही स्थितींचा प्रभाव दोन दिवसांत वाढणार असल्याने काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे.
नैर्ऋत्य मोसमी पावसाने यंदा राजस्थानातून परतीचा प्रवास ऐतिहासिक विलंबाने सुरू केला. १ सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू होणे अपेक्षत असताना तो राजस्थानातून ९ ऑक्टोबरला परत फिरला. मात्र, परतत असताना त्याने द्रुतगती दाखविली आहे. १ सप्टेंबरला राजस्थानातून माघारी फिरल्यानंतर तो दीड महिन्यांनी साधारणत: १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रातून परतत असतो. यंदा तो सात दिवसांतच महाराष्ट्रातून परतला. त्यानंतर एकाच दिवसाने म्हणजे १६ ऑक्टोबरला मोसमी पाऊस देशातून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.