मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. याचाच परिणाम म्हणून कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर असला तरी कोकण, घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
मागील १५ दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात गुरुवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भागात शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून रायगड जिल्ह्यातील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोहा, कोलाड, वाकण, खारघाव, खेड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरीसह रायगड, पुणे घाट परिसर , सातारा घाट परिसरात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार या कालावधीत जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. पुणे घाट परिसरातही पावसाचा जोर आहे. धरणक्षेत्रातही पावासाचा जोर वाढला आहे.
जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडली
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबईला अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने मुंबईत शनिवार आणि रविवारी अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्यामुळे आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईत पावसाची नोंद (शुक्रवार सकाळी ८.३० ते शनिवार सकाळी ८.३० पर्यंत)
विक्रोळी – २५७.५ मिमी
सांताक्रूझ – २४४.७ मिमी
शीव- २२८ मिमी
जुहू – २१९.५ मिमी
वांद्रे – १८४ मिमी
भायखळा -१७२ मिमी
चेंबूर – १३१.५ मिमी
कुलाबा – ८३.२ मिमी
कमी दाब क्षेत्र
बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेरपासून, कोटा, रायपूर, उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाब क्षेत्राच्या केंद्रापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रात गुजरात आणि कोकणाच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा ते कमी दाबाच्या केंद्रापर्यंत ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
राज्यात स्थिती काय
हवामान विभागाने कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
दिला आहे. याचबरोबर मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.