मुंबई : पश्चिम रेल्वेवरील माहीम रेल्वे स्थानकात रेल्वे आरक्षण खिडकीवर तोतया रेल्वे कर्मचारी कार्यरत असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रेल्वे दक्षता पथकाने कारवाई करून आरोपी विनोद दवंगे याला ताब्यात घेतले. तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनाने चार रेल्वे कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आरपीएफ विभाग करीत आहे.
माहीम रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील तिकीट खिडकी क्रमांक ५ वर ४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता रेल्वे दक्षता पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. या पथकातील मुख्य दक्षता निरीक्षक संदीप गोलकर, दक्षता निरीक्षक भाविक द्विवेदी आणि संजय शर्मा, आरपीएफ कर्मचारी दिनेश गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी करण्यात आली. त्यांनी यूटीएस काउंटर येथे पाहणी केली. स्थानक व्यवस्थापक रात्री ८.३० च्या सुमारास आरक्षण तिकीट कार्यालयात दाखल झाले आणि तिकीट खिडकीवर तोतया रेल्वे कर्मचारी विनोद दवंगे असल्याचे आढळले. तर, अधिकृत रेल्वे कर्मचारी शेजारच्या खोलीत मद्यधुंद अवस्थेत आढळले, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुख्य आरक्षण पर्यवेक्षक गणेश पाटील हे स्थानकात बोलवायचे. त्यांच्या देखरेखीखाली तिकीट खिडकी चालवण्याच्या सूचना दिल्या होत्या, असा दावा दवंगे याने केला. तथापि, दवंगे कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा रेल्वेने जारी केलेले ओळखपत्र सादर करू शकला नाही. त्याच्याकडून एकूण २,६५० रुपये जप्त करण्यात आले. नंतर ते पैसे सरकारी तिजोरी जमा करण्यात आले. याशिवाय खिडकीवरील रोख रकमेत तफावत आढळून आली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
दक्षता पथकाने विनोद दवंगे याला ताब्यात घेतले असून त्याला आरपीएफच्या हवाली करण्यात आले. याप्रकरणी रेल्वे कायद्यानुसार ५ जुलै रोजी रात्री १.१५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. दवंगेला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून ७ जुलै रोजी रेल्वे न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देऊन सोडण्यात आले. घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या चारही रेल्वे कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. यामध्ये मुख्य बुकिंग पर्यवेक्षक/सामान्य अंगद ढवळे, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक (संध्याकाळचा प्रभारी) खिडकी क्रमांक ४ येथे नियुक्तीवर असलेले रामशंकर आर., मुख्य बुकिंग पर्यवेक्षक/माहीम (खिडकी क्रमांक ५) गणेश पाटील आणि मुख्य बुकिंग क्लर्क/माहीम (खिडकी क्रमांक ६) विजय देवाडिगा यांचा समावेश आहे. विभागीय चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.