मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाने (शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू) शुक्रवारी एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या गाठला. प्रकल्पातील एकूण ७० ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकपैकी (ओएसडी) ६९ व्या, तर टप्पा २ मधील (पॅकेज २) शेवटच्या ‘ओएसडी’ची शुक्रवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यशस्वीपणे उभारणी केली. आता शेवटच्या ७० व्या ‘ओएसडी’ची उभारणी १२ मे रोजी करण्यात येणार असल्याने ‘ओएसडी’चे काम पूर्ण होणार आहे.

मुंबई – नवी मुंबई प्रवास सुकर आणि वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने २१.८० किमी लांबीच्या शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. सागरी सेतू अत्यंत मजबूत करण्यासाठी, तसेच काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी एमएमआरडीएने प्रकल्पात अत्याधुनिक अशा ‘ऑर्थोट्रोपिक स्टील डेक’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या परदेशी तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच भारतात मुंबई पारबंदर प्रकल्पात वापर केला जात आहे. टप्पा २ मध्ये ३ जानेवारी २०२२ रोजी पहिला ‘ओएसडी’  बसविण्यात आला. तर, आता शुक्रवारी (५ मे २०२३) टप्पा २ मधील शेवटच्या, तर प्रकल्पातील ६९ व्या ‘ओएसडी’ची यशस्वी उभारणी करण्यात आली. शेवटचा ७० वा ओएसडी शुक्रवार, १२ मे रोजी बसविण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हे सर्व ७० ‘ओएसडी’ बसविण्याचे आव्हानात्मक काम एमएमआरडीएने केवळ १६ महिन्यांत पूर्ण केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापरयत प्रकल्पाचे अंदाजे ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण करून हा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.