मुंबई : बोरीवली येथील बाजारपेठेत लसूण चोरल्याच्या संशयावरून झालेल्या अमानुष मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बोरीवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पंकज मंडल असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव होते. घटनेबाबत अर्शद शेख (३३) यांनी तक्रार दाखल केली आहे.
बोरीवली भाजी मार्केट परिसरात शेख आणि मंडल हमालीचे काम करत. मंडल हा शेख यांच्या झारखंडमधील गावचा असल्यामुळे लहानपणापासून ते त्याला ओळखत होते. घनश्याम खाक्रोडिया याने बुधवारी मंडलला लसुण चोरल्याच्या संशयावरून मारहाण केली. मंडल हमाली करताना लसूण चोरत असल्यामुळे माझे नुकसान झाले आहे. त्याला आज मारून टाकतो, असे घनश्याम बोलत होता. घनश्यामला समजावण्याचा उपस्थितांनी प्रयत्न केला. पण आज कोणी मधस्थी करू नका,मी त्याला संपवून टाकेन असा आरडाओरडा घनश्याम करत होता. पंकज जखमी होऊन खाली कोसळला असता एका व्यक्तीने मध्यस्थी करून घनश्यामला थांबवले आणि पंकजला एमटीएनएल प्रवेशद्वाराजवळ नेले. तेथे पंकज काही काळ झोपला. त्याला गुरूवारी सकाळी पाहण्यासाठी शेख गेले असता त्याच्या डोळ्यातून रक्तस्त्राव होत होता. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही.
हेही वाचा… गिरणी कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चितीला मुदतवाढ; १४ जानेवारीपर्यंत कागदपत्र सादर करता येणार
हेही वाचा… पनवेल ते मडगाव १४ विशेष रेल्वेगाड्या
अखेर शेख यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून माहिती दिली. पोलीस पथक घटनास्थळी आले असता त्यांनी पंकजला शताब्दी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अखेर शेख यांच्या तक्रारीवरून बोरीवली पोलिसांनी घनश्यामविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.