मुंबई : दहिसरच्या गणपत पाटील नगर येथे दोन गटात झालेल्या वादात तिघांचा मृत्यू झाला असून या हल्ल्यात चारजण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

दहिसरच्या गणपत पाटील नगर झोपडपट्टीतील १३ आणि १४ क्रमांकाच्या गल्लीत राहणारे हमीद शेख (४९) आणि रामनवल गुप्ता (५०) यांच्यात वाद सुरू होते. दोघांनी २०२२ मध्ये एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. गल्ली क्रमांक १४ येथे राम नवल गुप्ता याचा नारळ विक्रीचा स्टॉल आहे.

रविवारी संध्याकाळी हमिद शेख तेथे आला. जुन्या वादावरून त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. रामनवल गुप्ता याने त्याची तिन्ही मुले अमर, अरविंद आणि अमित यांना बोलावले. ते पाहून हमीद याची मुले अरमान आणि हसन हे देखील वडिलांच्या मदतीला आले. त्यामुळे वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रामनवल गुप्ता, त्याचा मुलगा अरविंद गुप्ता तसेच हमीद शेख या तिघांचा मृत्यू झाला. तर अमर गुप्ता, अमित गुप्ता, अरमान शेख आणि हसन शेख हे चौघे जखमी झाले आहेत.

दोन्ही कुटुंबामध्ये पूर्ववैमनस्य होते. त्या वादातून झालेल्या हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत, अशी माहिती पोलीस परिमंडळ ११ चे उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली. एमएचबी पोलीस ठाणे याप्रकरणाचा तपास करीत आहे. आरोपी जखमी असल्याने अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याचे एमएचबी पोलिसांनी सांगितले.