मुंबईः रेल्वेत चोरीला गेलेला मोबाइल तात्काळ शोधून देण्यासाठी २३ वर्षीय तरूणाने शिवडी येथील रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. यावेळी त्याने पोलीस शिपायाच्या नाकावर ठोसा मारून त्याला जखमी केले. तसेच स्वतःचे डोके टेबलावर आपटून पोलिसांना त्याप्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसाला जखमी करणे या कलमांतर्गत पोलिसांनी आरोपीला अटक केली.
जान्झेब सलीम खान (२३) असे आरोपीचे नाव असून तो शिवडी क्रॉस रोड येथील रहिवासी आहे. खानने मारल्यामुळे पोलीस शिपाई स्वप्नील कातुरे (३२) यांच्या नाकाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच खानने टेबलवर डोके आपटल्याने तोही जखमी झाला आहे. दोघांनाही परळ येथील केईएम रुग्णालयात प्रथमोपचार देण्यात आले. तक्रारीनुसार, खानचा मोबाइल रेल्वेत हरवला होता. त्याबाबत रेल्वेमध्ये त्याने तक्रार केली होती. पण त्यानंतरही मोबाइल न मिळाल्यामुळे तो स्थानिक आरएके मार्ग पोलीस ठाण्यात आला.
आपला मोबाइल तात्काळ शोधून द्यावा यासाठी त्याने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्याला समजावण्याचा प्रयत्न करणारे कातुरे यांच्या नाकावर त्याने ठोसा मारला. ते जखमी झाल्यानंतर खानने स्वतःचेही डोके टेबलावर आपटण्यास सुरूवात केली. जखमी झाल्यानंतर आपल्याला मारहाण केल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तेथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. कातुरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसाला जखमी करणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे, धमकावणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.